छापे टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला; घटनास्थळावरून पळ काढावा लागला!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 04:27 PM2024-01-05T16:27:29+5:302024-01-05T16:28:39+5:30
ईडीचे अधिकारी निमलष्करी दलांसह अधिकारी कथित रेशन वितरण घोटाळ्याच्या संदर्भात छापे टाकण्यासाठी गेले होते.
नवी दिल्ली: पश्चिम बंगालमध्येतृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांच्या समर्थकांनी ईडीच्या काही अधिकाऱ्यांवर हल्ला केला. तसेच त्यांच्या वाहनांवर देखील दगडफेक केली. जमावाच्या हल्ल्यानंतर पथकाला छापा न टाकता घटनास्थळावरून पळ काढावा लागला.
ईडीचे अधिकारी निमलष्करी दलांसह अधिकारी कथित रेशन वितरण घोटाळ्याच्या संदर्भात छापे टाकण्यासाठी गेले होते. तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते शाहजहान शेख यांच्या निवासस्थानाजवळ पोहोचल्यावर टीमवर हल्ला करण्यात आला. २००हून अधिक स्थानिक लोकांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना आणि केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलांना घेरले आणि त्यांच्यावर हल्ला केला. जखमी अधिकाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ईडीच्या काही अधिकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली असून गंभीर दुखापतींमुळे दोघांच्या डोक्याला टाके पडले आहेत. या परिस्थितीनंतर, केंद्रीय तपास एजन्सी टीएमसी नेत्याच्या विरोधात अटक वॉरंट मागण्यासाठी न्यायालयात जाणार आहे जेणेकरून ते त्याला ताब्यात घेऊन चौकशी करू शकतील. त्याला कोठडीबाहेर ठेवून या प्रकरणाचा तपास करणे आता कठीण होत असल्याचे ईडीच्या सूत्राचे म्हणणे आहे.
पुरावे नष्ट होण्याचा धोका-
आज कोर्टासमोर त्याच्यासोबत घडलेल्या या सर्व घटनांचा उल्लेख करणार असल्याचा दावाही ईडीच्या सूत्राने केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने हल्ल्यादरम्यान स्थानिक पोलिसांच्या निष्क्रियतेचा हवाला दिला. सरकारी कर्तव्यात अडथळा आणणे, सरकारी मालमत्तेची नासधूस करणे आणि अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली ते न्यायालयात तक्रार दाखल करणार आहेत, असा दावा सूत्राने केला आहे. सूत्राचा असाही दावा आहे की, संबंधित भागात केंद्रीय दले तैनात करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला जाऊ शकतो जेणेकरून कोणीही पुरावे नष्ट करू शकणार नाही.