लय भारी! व्हेज बिर्याणी विकण्यासाठी इंजिनिअरने सोडली नोकरी; आता पगारापेक्षा होतेय अधिक कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 05:45 PM2022-03-11T17:45:10+5:302022-03-11T17:48:26+5:30
Engineers Veg Biryani : व्हेज बिर्याणी विकण्यासाठी इंजिनिअरने नोकरी सोडली आणि आता पगारापेक्षा अधिक कमाई करत आहे.
नवी दिल्ली - नोकरीपेक्षा अनेकांना व्यवसायाकडे वळण्याची इच्छा असते. पण अनेकदा भांडवल आणि इतर काही गोष्टींमुळे ते शक्य होत नाही. पण काही जण प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करतात. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. व्हेज बिर्याणी विकण्यासाठी इंजिनिअरने नोकरी सोडली आणि आता पगारापेक्षा अधिक कमाई करत आहे. हरियाणातील दोन इंजिनीअर तरुणांची गोष्टही अशीच आहे. या तरुणांनी मोठ्या कष्टानं इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं. नोकरी मिळवली.
नोकरीतून समाधान मिळत नसल्याने त्यांनी 9 ते 5 या पारंपरिक वेळेची नोकरी सोडण्याचा आणि व्यवसाय सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला. हरियाणातल्या सोनीपत येथील रोहित आणि सचिन या दोन तरुणांनी चार ते पाच वर्षं कठोर मेहनत करत आपलं इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र आता या दोघांनी नोकरी सोडून देत `इंजिनीअर्स व्हेज बिर्याणी` (Engineers Veg Biryani) नावाचा छोटासा स्टॉल सुरू केला आहे. हे दोघं शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करत होते. पण मिळणाऱ्या पगारात समाधानी नसल्याने त्यांनी नोकरी सोडून व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला.
रोहित पॉलिटेक्निकचा विद्यार्थी होता तर सचिनने बी.टेक केलं आहे. नोकरीऐवजी व्यवसायातून पैसा कमवण्याचा या दोघांनी निर्णय घेतला. यासाठी त्यांनी सोनीपतमध्ये `इंजिनीअर्स व्हेज बिर्याणी` नावाचा स्टॉल सुरू केला. या स्टॉलवर ऑईल फ्री बिर्याणी मिळते. हाफ प्लेट बिर्याणीची किंमत 50 रुपये तर फुल प्लेटची किंमत 70 रुपये आहे. ही बिर्याणी अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे अर्थातच या दोघांचा व्यवसाय वाढला असून, नोकरीच्या तुलनेत अधिक पैसा या व्यवसायातून मिळत आहे.
लोकांचा वाढता प्रतिसाद बघता व्यवसायाचा विस्तार करण्याचा सचिन आणि रोहितचा मानस आहे. "आमच्या स्टॉलवरची बिर्याणी ग्राहकांना खूप आवडते, त्यामुळे प्रतिसाद वाढला असून, आमचा नफाही वाढला आहे" असा दावा रोहित आणि सचिनने केला आहे. आमचा बिझनेस अधिक वाढवण्याचा आम्ही विचार करत आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. रोहित आणि सचिनचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.