शिपाई पदाच्या नोकरीसाठी 129 इंजिनिअर्स, 23 वकील, एक सीए आणि 13 एमए डिग्री असणाऱ्यांनी दिली मुलाखत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 01:17 PM2018-01-05T13:17:29+5:302018-01-05T13:25:24+5:30
राजस्थान सचिवालयातील शिपाई पदाच्या नोकरीसाठी 129 इंजिनिअर्स, 23 वकील, एक सीए आणि 13 एम डिग्री असणाऱ्यांनी मुलाखत दिली आहे.
जयपूर- राजस्थान सचिवालयातील शिपाई पदाच्या नोकरीसाठी 129 इंजिनिअर्स, 23 वकील, एक सीए आणि 13 एम डिग्री असणाऱ्यांनी मुलाखत दिली आहे. राजस्थान सचिवालयातील शिपायाचं पद भरण्यासाठी मुलाखत द्यायला आलेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक डिग्री पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. शिपाई पदासाठी एकुण 12 हजार 453 लोकांनी मुलाखती दिल्या. निवड झालेल्या 18 जणांमध्ये रामकृष्ण मीणा या 30 वर्षीय तरूणाचा सहभाग असून त्याने दहावीपर्यंतच शिक्षण घेतलं आहे. रामकृष्ण मीणा हा भाजपा आमदाराचा मुलगा आहे. रामकृष्ण मीणा याच्या निवडीवरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. 15 डिसेंबर रोजी विधानसभेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार रामकृष्ण मीणा 12 व्या स्थानावर आहे. उमेदवारांच्या निवड प्रक्रियेमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप विरोधकांनी केला असून राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
राज्यात बेरोजगार तरूणांची संख्या वाढत असताना भाजपाचे नेते त्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरीमध्ये जागा देत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे राजस्थानमध्ये नोकऱ्यांचा तोटा आहे, असं सचिन पायलट यांनी म्हंटलं आहे. दरम्यान, जमवा रामगढचे आमदार जगदीश नारायण मीणा यांनी मुलाच्या निवड प्रक्रियेत कुठलीही गडबड झाली नसल्याचं म्हंटलं आहे. भर्तीमध्ये अनियमितता होण्याचा प्रश्नच नाही. माझ्या मुलाने सामान्य प्रक्रियेनुसार नोकरीसाठी अर्ज केला होता व मुलाखतीनंतर त्याची निवड झाली. मुलाला नोकरी देण्यासाठी मी माझ्या प्रभावाचा वापर केल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे, पण जर माझा इतका प्रभाव असता तर मी माझ्या मुलाला शिपायाची नोकरी का दिली असती ? कुठली तरी मोठी नोकरी दिली असती, असं स्पष्टीकरण जगदीश नारायण मीणा यांनी दिलं आहे.
राजस्थान सरकारनुसार, या नोकरीसाठी कमीतकमी पाचवी पास असणारा उमेदवार हवा होता. पण ज्यांच्या मुलाखती झाल्या त्यामध्ये 3600 लोक जास्त शिकलेले निघाले. यामध्ये 1533 कलाशाखेतील पदवीधर, 23 विज्ञान शाखेतील पदवीधर, 9 जणांकडे एमबीएची पदवी होती. याशिवाय हॉटेल मॅनेजमेंट, नर्सिंग पास उमेदवारांनीही नोकरीसाठी अर्ज केला होता.