दहशतवादाच्या विरोधातील लढाईत इंग्लंडची भारताला साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 04:53 AM2019-03-08T04:53:05+5:302019-03-08T04:53:22+5:30
अमेरिकेपाठोपाठ इंग्लंडही भारताला दहशतवादाच्या विरोधातील लढाईत साथ देणार आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेपाठोपाठ इंग्लंडही भारताला दहशतवादाच्या विरोधातील लढाईत साथ देणार आहे. दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी भारताला सर्व द्विपक्षीय सहकार्य करण्यास आपण तयार असल्याचे त्या देशाने म्हटले आहे.
भारताचे राष्टÑीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इंग्लंडचे राष्टÑीय सुरक्षा सल्लागार मार्क सेडविल यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. त्यावेळी इंग्लंडने पुलवामा हल्ल्याचा तीव्र निषेध करून दहशतवादाच्या विरोधात सहकार्य करण्याचा पुनरुच्चार केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा हल्ल्यानंतर डोवाल यांनी जागतिक स्तरावर पाकिस्तानमध्ये अस्तित्वात असलेल्या अतिरेकी संघटना व त्यांच्या कारवायांबाबत आपल्या समकक्षांशी चर्चा सुरू केली आहे. यातच त्यांनी इंग्लंडच्या सुरक्षा सल्लागारांशीही चर्चा केली. यावेळी मार्क म्हणाले की, भारताला सहकार्य करण्यासही तयार आहोत. यासाठी त्यांचा देश द्विपक्षीय स्तरावर दहशतविरोधी मोहीम, गुप्त माहितीचे आदानप्रदान करण्याबरोबरच दहशतवादाच्या दोषींना शिक्षा देण्यासाठी सदैव तत्पर राहणार आहे.