इंग्रजी शिक्षण देशभक्ती व माणुसकी शिकवू शकत नाही - मोहन भागवत
By admin | Published: December 7, 2015 09:47 AM2015-12-07T09:47:57+5:302015-12-07T09:49:28+5:30
मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देऊन त्यांना देशभक्ती व माणुसकी शिकवता येत नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ७ - मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देऊन त्यांना देशभक्ती व माणुसकी शिकवता येत नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले आहे. संघाचे संस्थापक के.बी. हेडगेवार यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनानंतर ते गोव्याच्या राजधानीत बोलत होते.
इंग्रजीत शिक्षण घेतल्यामुळे आपण पोटा-पाण्यापुरते कमविण्यास पात्र बनतो. हे स्वामी विवेकानंद यांचेच शब्द आहेत. पण आपल्याला अशा शाळांची गरज नाहीये. एक चांगला माणूस बनून इतरांची सेवा करण्यास शिकवेल, अशा शाळांची आपल्याला गरज आहे असे भागवत म्हणाले. वीर सावरकर यांच्यानुसार, आपल्याला मिळालेल्या विद्येमुळे, शिक्षणामुळे जर आपण देशाचं भलं करू शकत नसू तर आपलं शिक्षण व्यर्थ आहे, असेही भागवत यांनी सांगितले.
यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांच्यासह गोवा युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर आणि अनेक अधिकारी उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणा-या भाषेसंबंधी सरकारतर्फे घेण्यात येणा-या निर्णयावर भागवत यांच्या भाषणामुळे काहीही फरक पडणार नाही, असे पारसेकर यांनी स्पष्ट केले.