इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2016 02:08 AM2016-07-09T02:08:07+5:302016-07-09T02:08:07+5:30
इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना सुरू झालेले अनुदान कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही आणि कोणीही ते बंद करू शकणार नाही, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर
मडगाव (गोवा) : इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना सुरू झालेले अनुदान कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही आणि कोणीही ते बंद करू शकणार नाही, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी दवर्ली येथे एका कार्यक्रमात ठामपणे सांगितले.
राज्यातील इंग्रजी शाळांना सुरू केलेले अनुदान बंद करावे यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंचने आंदोलन सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पर्रीकर यांनी ही भूमिका पुन्हा स्पष्ट केली.
स्थानिक चर्चचे फा. प्रोतासियो सुवारिस कुलासो यांनी माध्यम प्रश्नाबद्दल शंका उपस्थित केली. तुम्ही गोव्यात असता तर आम्हा अल्पसंख्याकांना काळजी वाटली नसती; मात्र तुम्ही दिल्लीत गेल्यावर आमची काळजी वाढली आहे, असे फा. कुलासो म्हणाले.
त्यावर, अल्पसंख्याकांनी या सरकारबाबत कोणतीही भीती बाळगू नये. त्यांना जी आश्वासने दिली होती ती पूर्ण होतील. माध्यम प्रश्नाबद्दल कोणालाही भीती बाळगण्याची गरज नाही. आता जी व्यवस्था चालू आहे, ती यापुढेही चालूच राहील, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)