Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस यांचे मान्यवरांकडून अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 03:35 AM2019-11-24T03:35:35+5:302019-11-24T03:35:58+5:30
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे.
लखनौ : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे. योगी यांनी टष्ट्वीट केले आहे की, फडणवीस आणि पवार यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर जाईन.
हा राज्यपालांचा विशेषाधिकार : राजनाथसिंह
सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्या पक्षाला आमंत्रित करायचे हा राज्यपालांचा विशेषाधिकार आहे, असे मत संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, सध्या मी या विषयावर राजकीय वक्तव्य करणार नाही. हा राज्यपालांचा विशेषाधिकार आहे. फडणवीस आणि अजित पवार यांचे त्यांनी अभिनंदन केले.
महाराष्ट्र नवी उंची गाठेल
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या नेतृत्वात महाराष्ट्र नवी उंची गाठेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
पलानीस्वामी यांनीही केले अभिनंदन
तामिळनाडूतील सत्तारुढ अण्णाद्रमुकने महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी टष्ट्वीट करून या फडणवीस, अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे.
शरद पवारांनी एनडीएत यावे : आठवले
महाराष्ट्रातील राजकीय घटनाक्रमास शिवसेना जबाबदार आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएत यावे, असा आग्रह केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. ते म्हणाले की, शरद पवार यांनी आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा आणि एनडीएत यावे.