देशात रोजगाराची कमी नाही, पण कुशल तरुणांची उणीव; केंद्रीयमंत्र्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 03:48 PM2019-09-15T15:48:43+5:302019-09-15T15:59:43+5:30
गंगवार यांनी देशात रोजगार नसल्याची बाबच फेटाळून लावली आहे. मात्र त्यांनी युवकांमध्ये स्किल नसल्याचे सांगत आपल्याच सरकारच्या स्किल इंडिया प्रोग्रामची स्थिती सांगितल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नवी दिल्ली - देशावर सध्या आर्थिक मंदीचे सावट आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील रोजगार जात आहेत. निर्मिती क्षेत्रातील अनेक तरुणांना आणि कामगारांना आपला रोजगार गमवावा लागत आहे. वाहन क्षेत्रातील स्थिती अधिकच बिकट झाली आहे. अशा स्थितीत केंद्रीयमंत्री संतोष गंगवार यांनी अजबच तर्क मांडला आहे.
केंद्रीयमंत्री गंगवार यांनी बेरोजगार युवकांसंदर्भात अजब विधान केले आहे. ते बरेलीतील एका कार्यक्रमात बोलत होते. गंगवार म्हणाले की, देशात रोजगाराची काही कमतरता नाही. मात्र उत्तर भारतातील युवकांमध्ये स्किल अर्थात कौशल्य नाही. त्यामुळे या तरुणांना रोजगार देणे शक्य नाही. मी याच मंत्रालयाचे काम पाहतो, त्यामुळे मी सांगू शकतो की रोजगाराची कमतरता नसून ज्या कंपन्या रोजगार देण्यासाठी येतात, त्यांना युवकांमध्ये हवं ते कौशल्य दिसत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मागील पाच वर्षात कौशल्य विकास योजनेवर (स्कील इंडिया) हजारो कोटी रुपये खर्च केले आहे. मात्र गंगवार यांच्या वक्तव्याने स्किल इंडियाचं काय झालं असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच मग स्कील इंडिया कार्यक्रमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांच काय झालं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट आहे. हे आपण समजू शकतो, परंतु, रोजगार नाही हे म्हणणे चुकीचे असल्याचे गंगवार पुढे म्हणाले.
दरम्यान देशात बेरोजगारीने मागील ४५ वर्षांचा विक्रम मोडीत काढल्याची आकडेवारी काही दिवसांपूर्वीच जाहीर झाली होती. तर देशाचा आर्थिक विकासदर देखील ८ वरून पाचवर आला आहे. अशा स्थितीत काँग्रेसकडून सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल करण्यात येत आहे. मात्र गंगवार यांनी देशात रोजगार नसल्याची बाबच फेटाळून लावली आहे. मात्र त्यांनी युवकांमध्ये स्किल नसल्याचे सांगत आपल्याच सरकारच्या स्किल इंडिया प्रोग्रामची स्थिती सांगितल्याची चर्चा सुरू झाली आहे.