दिवाळीत फटाक्यांवर संपूर्ण बंदी अशक्य - सुप्रीम कोर्ट
By admin | Published: October 29, 2015 01:14 AM2015-10-29T01:14:43+5:302015-10-29T01:14:43+5:30
दिवाळीत फटाके वाजविण्यावर संपूर्ण बंदी घालणे व्यवहार्य नाही. शिवाय तसे केल्याने सामान्य नागरिकाच्या धार्मिक सण साजरा करण्याच्या हक्काचीही पायमल्ली होईल
नवी दिल्ली : दिवाळीत फटाके वाजविण्यावर संपूर्ण बंदी घालणे व्यवहार्य नाही. शिवाय तसे केल्याने सामान्य नागरिकाच्या धार्मिक सण साजरा करण्याच्या हक्काचीही पायमल्ली होईल, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या बंदीचा कोणताही आदेश देण्यास बुधवारी स्पष्ट नकार दिला.
अर्जुन गोपाल, आरव भंडारी आणि झोया राज भसिन या तीन छोट्या मुलांनी त्यांच्या वडिलांच्या मार्फत केलेल्या जनहित याचिकेवर झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश न्या. एच. एल. दत्तु यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, आम्ही अशी बंदी घालायचे म्हटले तर लोक म्हणतील फटाके वाजविणे हा आमचा हक्क आहे. अशा बंदीने गंभीर, अगदी गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. संपूर्ण बंदी नाही तरी निदान फटाके वाजविण्यास वेळेचे काही बंधन घालावे व गावातील एखादी जागा ठरवून लोकांनी तेथे जाऊन फटाके वाजवावे, अशी काही तरी व्यवस्था करावी, असे याचिकाकर्त्यांचे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांचे म्हणणे होते. यालाही नकार देताना सरन्यायाधीश म्हणाले, सॉरी, प्रत्येकाने गावातील नेहरू मैदानासाराख्या एखाद्या ठराविक ठिकाणी जाऊनच फटाके वाजवावेत, असे आम्ही सांगू शकत नाही.
स्वत:च्या घरासमोर किंवा घराबाहेरही फटाके वाजवू नका, असे लोकांना कसे काय सांगता येईल? असे करणे अव्यवहार्य ठरेल. त्यामुळे ज्याची अंमलबजावणी करता येणार नाही, असा कोणताही आदेश आम्ही देणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र ध्वनि प्रदूषण रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी फटाके वाजविण्यावर निर्बंध घालणाऱ्या २००५ मध्ये दिलेल्या आपल्या आदेशाचा न्यायालयाने पुनरुच्चार केला. त्यानुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळात मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्यास पूर्ण मज्जाव करण्यात आला आहे. मात्र फटाक्यांचे
आवाज आणि धूर यामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबात जनजागृती करणे व लोकांना नियमांचे पालन करण्यास उद्युक्त करणे यासाठी
पुरेशा गांभीर्याने प्रसिद्धी व प्रचार केला जात नसल्याबद्दल खंडपीठाने सरकारवर नाराजी व्यक्त केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)