संपूर्ण देश CAAचा विरोध करतोय, भाजपला निवडणुकीतून उत्तर मिळेल; केजरीवालांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 10:08 PM2024-03-11T22:08:42+5:302024-03-11T22:09:45+5:30

भाजपचा हा निर्णय देशविरोधी असून लोक त्यांना निवडणुकीतून धडा शिकवतील, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

Entire country opposes CAA BJP will get answer in elections says aap arvind Kejriwal | संपूर्ण देश CAAचा विरोध करतोय, भाजपला निवडणुकीतून उत्तर मिळेल; केजरीवालांची टीका

संपूर्ण देश CAAचा विरोध करतोय, भाजपला निवडणुकीतून उत्तर मिळेल; केजरीवालांची टीका

Arvind kejriwal ( Marathi News ) : केंद्र सरकारने आज अचानक नागरिकत्व सुधारणा कायद्याची (CAA) अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयानंतर सत्ताधारी पक्षातील नेते या निर्णयाचं स्वागत करत असताना विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसनंतर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर आक्रमक शब्दांत टीका करत हल्लाबोल केला आहे. भाजपचा हा निर्णय देशविरोधी असून लोक त्यांना निवडणुकीतून धडा शिकवतील, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

सरकारच्या निर्णयावर टीका करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, "दहा वर्षांपासून देशावर राज्य करणारे मोदी सरकार आता ऐन निवडणुकीच्या आधी CAA कायदा घेऊन आलं आहे. देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय व्यक्ती महागाई आणि बेरोजगारीमुळे संघर्ष करत असताना या खऱ्या प्रश्नांपासून लक्ष वळवण्यासाठी ही लोकं CAA घेऊन आली आहेत. शेजारील तीन देशांमधील अल्पसंख्यांक नागरिकांना नागरिकता मिळेल, असं सांगितलं जात आहे. म्हणजे सत्ताधारी आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी शेजारील देशातील नागरिकांना भारतात आणू इच्छित आहेत. जेव्हा आपल्या देशातील तरुणांकडे रोजगार नाही, तर शेजारील देशांमधून येणाऱ्या नागरिकांना रोजगार कोण देणार? त्यांच्यासाठी घरे कोण बनवणार? भाजप त्यांना नोकऱ्या देणार आहे का? भाजप त्यांच्यासाठी घरे बनवणार आहे का?  सत्ताधाऱ्यांच्या धोरणाला आणि त्रासाला कंटाळून मागील १० वर्षांत ११ लाखांहून अधिक व्यापारी आणि उद्योजक देश सोडून गेले आहेत. त्यांना माघारी आणण्यासाठी प्रयत्न करायचं सोडून भाजप शेजारील देशातील गरीब व्यक्तींना भारतात आणत आहे. फक्त आपली व्होट बँक वाढवण्यासाठी?" असा संतप्त सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.

"संपूर्ण देश आज CAA चा विरोध करत आहे. आमच्या मुलांना नोकऱ्या द्या, आपल्या लोकांना आधी घरे द्या आणि मग दुसऱ्या देशातील लोकांना इकडे आणा. स्थानिक लोकांचे रोजगार कमी होतात म्हणून जगभरातील सर्व देश दुसऱ्या देशातील गरिबांना आपल्या देशात येण्यापासून रोखतात. मात्र भाजप हा जगातील एकमेव असा पक्ष असेल जो शेजारच्या देशातील नागरिकांना इथं आणून राजकारण करत आहे. हे कृत्य देशविरोधी आहे," अशा शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.

दरम्यान, "विशेषत्वाने जे बांगलादेशमधून होणाऱ्या स्थलांतराने आधीच ग्रस्त आहेत ते आसाम आणि उत्तर पूर्व भारतातील लोक याचा तीव्रपणे विरोध करत आहेत. भाजपने संपूर्ण आसाम आणि उत्तर पूर्वेकडील राज्यांना धोका दिला आहे," असंही अरविंद केजरीवाल म्हणाले.
 

Web Title: Entire country opposes CAA BJP will get answer in elections says aap arvind Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.