गुजरातमधील शाळेत अर्जावर 'भारत माता की जय' लिहिलं तरच प्रवेश
By admin | Published: April 4, 2016 10:52 AM2016-04-04T10:52:45+5:302016-04-04T10:59:02+5:30
अमरेली येथील श्री पटेल विद्यार्थी आश्रम ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेने या प्रकरणात विद्यार्थ्यांना खेचून वेगळेच वळण दिलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
अहमदाबाद, दि. ४ - 'भारत माता की जय' बोलण्यावरुन देशभरात वाद-विवाद सुरु असताना गुजरातमध्ये या प्रकरणाने वेगळेच वळण घेतलं आहे. अमरेली येथील श्री पटेल विद्यार्थी आश्रम ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेने या प्रकरणात विद्यार्थ्यांना खेचल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. ज्या विद्यार्थ्यांना या संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे त्यांना अर्जावर 'भारत माता की जय' लिहावं लागणार आहे अन्यथा त्यांना प्रवेश मिळणार नाही असं सांगण्यात आलं आहे. भाजपा नेता दिलीप संघानी हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
अमरेलीमध्ये श्री पटेल विद्यार्थी आश्रम ट्रस्टचे संस्थेचं प्राथमिक विद्यालिय, दोन हायस्कूल आणि कॉलेज आहे. सध्या या संस्थेत 4500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रविवारी झालेल्या संस्थेच्या बैठकीत हा अजब निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात येण्यासाठी दिलीप संघानी यांनी हा निर्णय घेतला गेल्याचा आरोप इतर पक्षातील राजकीय नेते करत आहे. दिलीप संघानी यांना याबाबत विचारले असता 104 वर्ष जुन्या संस्थेकडून विद्यार्थ्यांना देशभक्तीची प्रेरणा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं आहे.
'सध्या जेव्हा शैक्षणिक कॅम्पसमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या जात आहेत त्यावेळी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांनी देशाचा आदर करावा अशी अपेक्षा करतो. त्यामुळे आम्ही अर्जावर 'भारत माता की जय' लिहिणा-यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्यसैनिक मोहन वीरजी पटेल यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. अशाप्रकारचा देशभक्तीचा वारसा असणा-या या संस्थेची विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत करणे जबाबदारी आहे. येणा-या टर्मसाठी हा नियम लागू असणार आहे. जे विद्यार्थी अर्जावर 'भारत माता की जय' लिहिणार नाहीत त्यांना प्रवेश मिळणार नाही', असं दिलीप संघानी यांनी सांगितलं आहे.
राज्यशिक्षण मंत्री भुपेंद्रसिंग चुडासमा यांनी अशाप्रकारे कोणीही जबरदस्ती करु शकत नसल्याचं म्हंटलं आहे. हा एका संस्थेचा वैयक्तिक निर्णय आहे. याचा भाजपाशी काही संबंध नाही. भारत माता की जय म्हणणं ही चांगली गोष्ट आहे मात्र त्याची सक्ती केली जाऊ शकत नाही. मला याप्रकरणी कोणतीच तक्रार आलेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हक्कांचं उल्लंघन झालं आहे क नाही ? असं भुपेंद्रसिंग चुडासमा बोलले आहेत.