गंगा स्वच्छतेसाठी उपोषणाला बसलेल्या जी. डी. अग्रवाल यांचं 111 व्या दिवशी निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 06:56 PM2018-10-11T18:56:10+5:302018-10-11T18:59:28+5:30
अग्रवाल यांनी मंगळवारपासून पाणी पिण्यासदेखील नकार दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशासनानं त्यांना जबरदस्तीनं ऋषिकेश येथील एम्समध्ये दाखल केलं.
हरिद्वार: गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी उपोषणाला बसलेले पर्यावरणवादी जी. डी. अग्रवाल यांचं निधन झालं आहे. उपोषणाच्या 111 व्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते. त्यांनी मंगळवारपासून पाणी पिण्यासदेखील नकार दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशासनानं त्यांना जबरदस्तीनं ऋषिकेश येथील एम्समध्ये दाखल केलं. जी. डी. अग्रवाल हे ज्ञानस्वरूप सानंद नावानंदेखील ओळखले जायचे.
जी. डी. अग्रवाल गंगा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी 22 जूनपासून उपोषणाला बसले होते. मातृसदन येथे त्यांचं उपोषण सुरू होतं. मंगळवार त्यांनी जल त्याग केला. हरिद्वारचे खासदार डॉ. रमेश पोखरियाला निशंक यांनी त्यांना जल त्याग न करण्याची विनंती केली होती. मात्र निशंक यांची ही विनंती अग्रवाल यांनी मान्य केली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील त्यांच्या प्रतिनिधींना पाठवून अग्रवाल यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती.