ईपीएफमधून मुदतीआधी काढा ५ लाख, ईपीएफओकडून ऑटो क्लेम मर्यादा वाढविण्यास मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 06:47 IST2025-04-02T06:47:27+5:302025-04-02T06:47:51+5:30
EPFO: कर्मचारी भविष्य निधीच्या (ईपीएफ) अग्रीम दाव्यांच्या स्वयंचलित निपटाऱ्यासाठी (एएसएसी) असलेली सध्याची १ लाख रुपयांची मर्यादा वाढवून ५ लाख रुपये करण्याच्या प्रस्तावास कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) मंजुरी दिली आहे.

ईपीएफमधून मुदतीआधी काढा ५ लाख, ईपीएफओकडून ऑटो क्लेम मर्यादा वाढविण्यास मंजुरी
नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निधीच्या (ईपीएफ) अग्रीम दाव्यांच्या स्वयंचलित निपटाऱ्यासाठी (एएसएसी) असलेली सध्याची १ लाख रुपयांची मर्यादा वाढवून ५ लाख रुपये करण्याच्या प्रस्तावास कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) मंजुरी दिली आहे. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या मंजुरीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल.
‘एएसएसी’ व्यवस्थेला ‘ऑटो क्लेम’ असेही म्हटले जाते. याच नावानेच ही यंत्रणा लोकप्रिय झाली आहे. केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी सांगितले की, २८ मार्च रोजी श्रीनगरमध्ये झालेल्या ईपीएफओच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत या प्रस्तावास मंजुरी दिली. प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सीबीटीला पाठविला आहे. या मंजुरीनंतर कर्मचारी आपल्या ईपीएफ खात्यातून विना पडताळणी ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतील. सध्या ऑटो क्लेमच्या साह्याने १ लाख रुपयेच काढता येतात. त्यापेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी ईपीएफओ अधिकाऱ्यांकडून पडताळणी प्रक्रिया पार पाडली जाते.
काय आहे ऑटो क्लेम?
‘एएसएसी’ अथवा ऑटो क्लेम ही एक स्वयंचलित यंत्रणा आहे. ईपीएफमधून पैसे काढण्यासाठी दाखल केलेल्या दाव्यास ही यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने स्वत:च मंजुरी देते. यात मानवी हस्तक्षेपाची गरज नसते. केवायसी पडताळणी पूर्ण झालेली असल्यास अवघ्या ३ ते ५ दिवसांत दाव्याचे पैसे मंजूर होतात. यात दस्तावेज जमा करण्याची अथवा ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरज नसते.