'पेन्शन'चं आता 'नो टेन्शन'!, EPFO ने सुरू केली नवी योजना; जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 09:35 AM2022-05-09T09:35:26+5:302022-05-09T09:36:11+5:30
पेन्शनधारकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी 'ईपीएफओ'ने (EPFO) पुढाकार घेतला आहे.
नवी दिल्ली-
पेन्शनधारकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी 'ईपीएफओ'ने (EPFO) पुढाकार घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत घेतलेल्या पुढाकाराअंतर्गत ईपीएफओकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना काही नवीन सुविधा दिल्या जात आहेत. 'ईपीएफओ'ने जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत रद्द केली आहे. तर आता कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशीच 'पेन्शन पेमेंट ऑर्डर' देण्याची व्यवस्था देखील केली आहे.
EPFO नं यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. "EPFO द्वारे 'अखंड सेवा': सदस्य निवृत्तीच्या दिवशी पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) मिळवू शकतील. सर्व प्रादेशिक कार्यालयं 'सेवानिवृत्तीच्या दिवशी पीपीओ जारी करण्यासाठी प्रयत्न' या शीर्षकानं मासिक वेबिनार आयोजित करत आहेत. तीन महिन्यांच्या आत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियोक्त्यांसोबत वेबिनारमध्ये मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी आमंत्रित केले जात आहे. या उपक्रमाचा लाभ दरवर्षी निवृत्त होणाऱ्या सुमारे ३ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे", असं ट्विट EPFO नं केलं आहे.
केव्हाही जमा करता येणार लाइफ सर्टिफिकेट
यापूर्वी, ईपीएफओनं सांगितलं होतं की आता पेन्शनधारक संपूर्ण वर्षात कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात, जे पुढील एक वर्षासाठी वैध असेल. निवृत्ती वेतनधारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावं लागतं. असं करण्यात अयशस्वी झाल्यास तुमचं पेन्शन थांबवलं जाण्याचा धोका असतो. EPFO च्या मते, EPS 95 चे निवृत्तीवेतनधारक कोणत्याही मुदतीशिवाय वर्षातून कधीही त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. हे प्रमाणपत्र सादर केल्याच्या तारखेपासून पुढील एक वर्षासाठी वैध असेल. म्हणजेच, जर एखाद्या पेन्शनधारकाने १५ एप्रिल २०२२ रोजी त्याचे जीवन प्रमाणपत्र सादर केले, तर पुढील वेळी त्याला १५ एप्रिल २०२३ पूर्वी कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करता येऊ शकतं.
खासगी क्षेत्रातील या कर्मचाऱ्यांना दिलासा
EPS 95 च्या या योजनेच्या कक्षेत खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळतो. EPFO ने डिसेंबर 2019 मध्ये अशा कर्मचार्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे नियम बदलले होते. यासह, ईपीएफओने दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे बंधन दूर केले आणि लाभार्थ्यांना ते वर्षभरात कधीही सादर करण्याची सवलत दिली. ईपीएफओच्या या नव्या उपक्रमामुळे त्याला खासगी क्षेत्रात काम करण्याची परवानगी मिळाली आहे. EPFO च्या या नव्या उपक्रमामुळे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.