EPFO ची जबरदस्त सेवा सुरु; देशभरात कोणत्याही क्षेत्रिय कार्यालयात करता येणार क्लेम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 10:50 AM2020-06-16T10:50:50+5:302020-06-16T10:51:30+5:30
ईपीएफओने मल्टी-लोकेशन क्लेम सेटलमेंट सेवा सुरु केली आहे. याआधी क्लेम करायचा असल्यास संबंधित रिजनल कार्यालयाला क्लेम फॉर्म पाठवावा लागत होता.
नवी दिल्ली : देशभरातील खासगी, सरकारी नोकरदारांना भविष्याची बेगमी करणारी सरकारी संस्था EPFO दिवसेंदिवस कमालीची अद्ययावत होत आहे. लॉकडाऊनमध्येच EPFO ने कात टाकली आहे. कर्मचाऱ्यांना त्यांचा पीएफ आता कुठूनही काढता येणार आहे.
ईपीएफओने मल्टी-लोकेशन क्लेम सेटलमेंट सेवा सुरु केली आहे. याआधी क्लेम करायचा असल्यास संबंधित रिजनल कार्यालयाला क्लेम फॉर्म पाठवावा लागत होता. यामुळे नोकरीचे ठिकाण, कंपनी, राज्य बदलल्यास कर्मचाऱ्यांना मोठी समस्या येत होती. एकतर बेभरवशी पोस्टल, कुरिअर सेवा किंवा स्वत:हून ईपीएफओ कार्यालयात जाऊन कामे करावी लागत होती. आता ही कटकट वाचणार आहे.
कामगार मंत्रालयानुसार नवीन सुविधेमध्ये क्षेत्रिय कार्यालयांची व्यवस्था बदलण्यात आली आहे. आता यापुढे देशभरातील कोणत्याही ईपीएफओ कार्यालयामध्ये कोणत्याही अन्य क्षेत्रातील दावे सोडविले जाणार आहेत.
या नव्या सुविधेनुसार भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, अंशत: पीएफ काढणे आणि अन्य दाव्यांचे निराकरण कोणत्याही कार्यालयातून केले जाणार आहे. तसेच ऑनलाईन दाव्यांवरही काम केले जाणार आहे. यामुळे दाव्यांना लागणारा वेळ कमी होणार आहे. यामुळे पीएफची नोंदणी असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कोरोना संकटामुळे कर्मचारी स्थलांतर किंवा अडकलेले आहेत. त्यांना ही समस्या जाणवत होती. यावर ईपीएफओने कायमचा तोडगा काढला आहे.
याचबरोबर कोरोना लॉकडाऊनमुळे मुंबई, ठाणे, हरियाणा आणि चेन्नईमधील क्षेत्रिय कार्यालयांमध्ये दाव्याचा निपटारा करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. तर ईपीएफओने सूट दिल्याने दाव्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे हे दावे मंजूर करण्यासाठी वेळ लागत आहे. आता लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत झालेले ईपीएफओ खातेधारक त्यांच्या जवळच्या क्षेत्रिय कार्यालयामध्ये दावे करू शकणार आहेत.
EPFOची देशभरात एकून 135 क्षेत्रीय कार्यालये आहेत. यामध्ये 65 लाख पेंशनर्स आहेत. कोरोना संकटात आव्हाने असताना अधिकाऱ्यांनी मे 2020 पर्यंत सर्वांना पेन्शन दिली आहे. याचबरोबर एप्रिल 2020 पासून 2,70,000 रकमेच्या 80 हजारहून अधिक दाव्यांचा दर दिवशी निपटारा करण्य़ात येतो.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खाट का कुरकुरतेय? विधान परिषदेवरून शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा
TikTok ची कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत?; व्हिडीओ अॅप बंद करणार
"सुशांत कसा आहे?" मृत्यू सहन होईना; वहिनीने सोडला प्राण
भविष्यवाणी! भारतावर मोठे संकट; 4.4 डिग्रीने पारा चढणार
जग दुसऱ्या मोठ्या महामारीच्या उंबरठ्यावर; सिंहाच्या हाडांपासून औषध, मद्याची निर्मिती घातक