जुलै अखेर ईपीएफओ सदस्यांना मिळू शकते व्याज; उच्चस्तरीय सूत्रांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 06:51 AM2021-06-03T06:51:46+5:302021-06-03T06:52:40+5:30
येत्या जुलैअखेरपर्यंत व्याजाची रक्कम सदस्यांच्या खात्यावर जमा होऊ शकते, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सहा कोटी सदस्यांना २०२०-२१ या वित्त वर्षासाठी ८.५ टक्के दराने व्याज दिले जाण्याची शक्यता असून, येत्या जुलैअखेरपर्यंत व्याजाची रक्कम सदस्यांच्या खात्यावर जमा होऊ शकते, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी
दिली.
सूत्रांनी सांगितले की, यासाठी आवश्यक असणारी परवानगी ईपीएफओला कामगार मंत्रालयाकडून मिळाली आहे. यासंबंधीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाऊ शकते. गेल्यावर्षी २०१९-२० या वित्त वर्षाचे व्याज मिळण्यासाठी अनेक ईपीएफओ खातेधारकांना तब्बल दहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली होती.
ईपीएफओने वित्त वर्ष २०२०-२१ साठी व्याजदरात बदल न करण्याचा निर्णय घेतला असून, व्याजदर ८.५ टक्के असा कायम ठेवला आहे. याशिवाय कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे खातेधारकांना बिना परतफेडीची कोविड-उचल काढण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यासाठी आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफ शिलकीचा तपशील सदस्यास मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल.