आता तुमचा क्लेम वारंवार रिजेक्ट होणार नाही, EPFO ने जारी केली नवी गाइडलाइन; नक्की वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 09:28 AM2022-12-08T09:28:31+5:302022-12-08T09:29:37+5:30
EPFO New Guideline For Online Claim : जर तुम्ही घरबसल्या ईपीएफ क्लेमसाठी ऑनलाइन अर्ज केला असेल आणि तुमचा क्लेम वारंवार नाकारला जात असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
EPFO New Guideline For Online Claim : जर तुम्ही घरबसल्या ईपीएफ क्लेमसाठी ऑनलाइन अर्ज केला असेल आणि तुमचा क्लेम वारंवार नाकारला जात असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. यासाठी EPFO ने प्रादेशिक कार्यालयांना एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. जेणेकरून आता तुमचा क्लेम रिजेक्ट होणार नाही. ईपीएफओने प्रादेशिक कार्यालयांना एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे की ईपीएफसाठी केल्या जाणार्या ऑनलाइन दाव्यांवर लवकरात लवकर प्रक्रिया करावी. एकच क्लेम अनेक कारणांसाठी नाकारला जाऊ नये असंही नमूद करण्यात आलं आहे.
ईपीएफओच्या या मार्गदर्शक तत्त्वानंतर क्लेम वारंवार रिजेक्ट होणार नाही अशी अपेक्षा आहे. प्रत्येक क्लेमची प्रथमतः सखोल चौकशी केली जावी आणि नाकारण्याचे कारण प्रथमच सदस्याला कळवण्यात यावे. अनेकदा तोच दावा वेगवेगळ्या कारणांनी फेटाळला जात असल्याचे तपासात आढळून आलं आहे, असं ईपीएफओनं म्हटलं आहे.
क्षेत्रीय कार्यालयांनी देखील अशाच प्रकारचे पीएफ दावे नाकारल्याचा अहवाल परिमंडळ कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठवणे आवश्यक आहे जेणेकरून अपेक्षित वेळेत प्रक्रिया केली जाईल. सदस्यांच्या तक्रारी काही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पाळल्या जाणार्या अनियमित पद्धतींकडे निर्देश करतात. गैरप्रकारांमुळे सदस्यांना योग्य लाभ सेवा वितरीत करण्यात विलंब होतो ज्यामध्ये अनावश्यक कागदपत्रे मागवणे इत्यादी कारणांचा समावेश आहे. चुकीच्या प्रथा तातडीने बंद करण्याच्या सूचना मंत्रालयाने दिल्या आहेत.
क्लेम रिजेक्ट होऊ नये
ईपीएफओनं केलेल्या विभागीय चौकशीत असं निदर्शनास आलं की अनेक प्रकरणांमध्ये क्लेम एका विशिष्ट कारणास्तव वारंवार फेटाळले गेले आणि जेव्हा ते दुरुस्त केल्यानंतर पुन्हा सादर केले गेले, तेव्हा ते इतर/वेगळ्या कारणांमुळे पुन्हा नाकारले गेले. सर्व जबाबदार अधिकार्यांनी कोणताही दावा फेटाळला जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच कारण नसताना जाणूनबुजून दावा नाकारल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं ईपीएफओनं म्हटलं आहे.