प्रधान राेजगारदात्यांसाठी नवी इलेक्ट्रॉनिक सुविधा; ‘ईपीएफओ’ने ट्विट करून दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 04:53 AM2021-02-11T04:53:24+5:302021-02-11T04:53:41+5:30
कंत्राटदारांवर नियंत्रण ठेवणे होणार सोपे
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संस्थेने (ईपीएफओ) प्रधान रोजगारदात्यांसाठी (प्रिन्सिपल एम्प्लॉयर्स) विशेष इलेक्ट्रॉिनिक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेद्वारे आपल्या कंत्राटदारांकडून ईपीएफ नियमांचे पालन होते की नाही, यावर देखरेख ठेवणे प्रधान रोजगारदात्यांना सोपे होणार आहे.
ईपीएफओच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून नव्या सुविधेची माहिती देण्यात आली आहे. रोजगार देणाऱ्या संस्थेचा मालक, वापरकर्ता अथवा व्यवस्थापक यास प्रधान रोजगारदाता म्हटले जाते. या व्यक्तीकडे आस्थापना अथवा कंपनीचे नियंत्रण अपेक्षित आहे. कंत्राटदारामार्फत कंत्राटी कामगार ठेवण्याचे अधिकार प्रधान रोजगारदात्याकडे असतात. नियम पालन प्रभावी व्हावे, यासाठी प्रधान रोजगारदाता आणि श्रम कंत्राटदार यांना परस्परांशी जोडण्याचे काम नवी सुविधा करते. ही सुविधा ईपीएफओच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सूत्रांनी सांगितले की, या सुविधेवर कंपनी अथवा आस्थापनेचे कार्यादेश, बाह्य कार्य कंत्राट अथवा कंत्राटी कामगार यांची माहिती अपलोड केली जाऊ शकते. ई-गव्हर्नन्स व्यवस्था प्रभावीपणे राबवून भविष्य निर्वाह निधीचा लाभ पात्र कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
नोंदणीसाठी दोन श्रेणी
या नव्या इलेक्ट्रॉिनिक सुविधेवर दोन श्रेणीत नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या संस्था ईपीएफओशी आस्थापना कोड आणि मोबाईल क्रमांकाने नोंदणीकृत आहेत, त्यांच्यासाठी एक व्यवस्था असून पॅन व मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणीकृत असलेल्या सरकारी संस्था व विभागासाठी दुसरी व्यवस्था आहे. सूत्रांनी सांगितले की, या व्यवस्थेद्वारे ईपीएफओने प्रधान रोजगारदात्यांसाठी नियंत्रण व नियमन अधिक सुलभ केले आहे. त्यामुळे अनुपालन अधिक सोपे होईल.