LOC जवळील कुपवाडा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 15:01 IST2023-11-07T14:59:39+5:302023-11-07T15:01:33+5:30
Chhatrapati Shivaji Maharaj: जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

LOC जवळील कुपवाडा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण
जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य सरकारमधील सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे उपस्थित होते.
मागील आठवड्यात हा पुतळा जेव्हा या परिसरात दखल झाला तेव्हा राष्ट्रीय रायफल्स-41 च्या जवानांनी ढोल ताशे आणि झांज वाजवून जल्लोषात स्वागत केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैंस यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दि. २० ऑक्टोबर रोजी राजभवन येथे झाले होते. त्यानंतर हा पुतळा कुपवाडाच्या दिशेने रवाना करण्यात आला होता.
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्यातून “आम्ही पुणेकर” या संस्थेतर्फे हा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यासाठी “आम्ही पुणेकर” संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव आणि विश्वस्त श्री अभयराज शिरोळे हे यांच्यासह त्यांच्या सदस्यांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत.
कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात आलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडे दहा फुट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ x ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात आला आहे. नवीन तंत्रज्ञानाने बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू काश्मीर मधील प्रतिकूल हवामानात दिर्घकाळ तग धरेल असा बनवला गेला आहे. सदर संस्थेतर्फे कुपवाडा येथे भारतीय सैन्यासोबत विविध दीर्घकालीन उपक्रम प्रस्तावित आहेत.