कैरानातील पलायन; भाजपाने केले घूमजाव
By admin | Published: June 15, 2016 04:01 AM2016-06-15T04:01:12+5:302016-06-15T04:01:12+5:30
उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील कैराना पलायनप्रकरणी भाजपाचे खासदार हुकूमसिंग यांनी मंगळवारी अचानक घूमजाव केले. कैरानातील हिंदूंचे पलायन हा ‘सांप्रदायिक’ मुद्दा नाही, तर त्याचा
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील कैराना पलायनप्रकरणी भाजपाचे खासदार हुकूमसिंग यांनी मंगळवारी अचानक घूमजाव केले. कैरानातील हिंदूंचे पलायन हा ‘सांप्रदायिक’ मुद्दा नाही, तर त्याचा कायदा व सुव्यवस्था परिस्थितीशी अधिक संबंध आहे, असे हुकूमसिंग म्हणाले. पलायन करणाऱ्या कुटुंबांची संख्या ४०० ते ५०० पर्यंत वाढू शकते, असेही त्यांनी सांगितले.
या कुटुंबांनी ‘सांप्रदायिक तणावा’मुळे नव्हे तर ‘आर्थिक कारणां’वरून गाव सोडले असल्याचे शामलीचे जिल्हाधिकारी सुजीत कुमार यांनी स्पष्ट केले. ‘हा सांप्रदायिक स्वरुपाचा मुद्दा नाही. हा हिंदू किंवा मुस्लिमांचाही प्रश्न नाही. त्याचा संबंध कायदा व सुव्यवस्थेशी अधिक आहे,’ असे कैरानाचे खासदार हुकूमसिंग म्हणाले. लोकांना पलायन करण्यास बाध्य करणारा एक आरोपी नाही तर आरोपींची संख्या डझनावर आहे. हे लोक कोण आहेत, हे आरोपींची नावे पाहूनच आपण समजू शकतो, असे याआधी सांगून हुकूमसिंग यांनी या पलायनामागे मुस्लिम सहभागी असल्याचे संकेत दिले होते. कैरानात सांप्रदायिक तणाव नाही. बाबरी मशीद पाडली त्यावेळी आणि मुजफ्फरनगरची दंगल घडली त्यावेळीही कैराना शांत होते. येथील लोकांनी बंधुभावाचा बळकट संदेश देशाला दिला आहे, असे सुजीत कुमार यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)