गरोदर महिलांसाठी केंद्र सरकारचा निर्णय; आता प्रसूती खर्चासाठी मिळणार ७,५०० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 10:04 AM2020-07-29T10:04:20+5:302020-07-29T10:05:02+5:30
फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नवी दिल्ली – कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) च्या अंतर्गत गरोदर महिलांना प्रसूती खर्चासाठी यापुढे ७ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे. लवकरच या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळेल. केंद्रीय कामगार मंत्रालयाने याबाबत एक ड्राफ्ट तयार करुन नोटिफिकेशन काढलं आहे. येत्या ३० दिवसांत लोकांकडून या ड्राफ्टवर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत.
फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत सरकारने कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) आरोग्य विमा योजनेंतर्गत प्रसुती खर्च ७ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. सध्या ही रक्कम ५ हजार रुपये आहे. म्हणजेच यात २ हजार ५०० रुपयांची वाढ प्रस्तावित आहे.
ईएसआयसीच्या आरोग्य विमा योजनेतंर्गत महिला कर्मचारी अथवा पुरुष कर्मचाऱ्याच्या पत्नीला हा प्रसुती खर्च देण्यात येतो. हा प्रसुती खर्च ईएसआयसीच्या हॉस्पिटल अथवा औषध केंद्रापर्यंत पोहचू न शकलेल्या महिलांची इतर रुग्णालयात प्रसुती होते, त्यांना प्रसुती खर्च म्हणून याचा लाभ दिला जातो. त्यासोबत फक्त २ प्रसुतीसाठी हा खर्च देण्यात येतो. त्यामुळे सरकारच्या या निर्णयानंतर गर्भवती महिलांना प्रसूती खर्चासाठी २ हजार ५०० रुपये अतिरिक्त मिळतील.