लाखो कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; खासगी हॉस्पिटलायझेशनवर ESIC ने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 03:47 PM2020-12-12T15:47:58+5:302020-12-12T15:48:56+5:30
ESIC Scheme: ईएसआयसीच्या फायद्यांसाठी 21000 रुपयांपर्यंत पगार असलेले कर्मचारी पात्र आहेत. त्यांच्या व कुटुंबाच्या आजारपणाचा खर्च ईएसआयसी करते. या योजनेत खासगी आणि सरकारी कर्मचारी देखील येतात.
एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC) ने नुकताच लाखो कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी संबंधित मोठा निर्णय घेतला आहे. आपत्कालीन स्थितीत हे कर्मचारी जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवा घेऊ शकणार आहेत. याला मंजुरी देण्यात आली आहे.
ईएसआयसीच्या फायद्यांसाठी 21000 रुपयांपर्यंत पगार असलेले कर्मचारी पात्र आहेत. त्यांच्या व कुटुंबाच्या आजारपणाचा खर्च ईएसआयसी करते. या योजनेत खासगी आणि सरकारी कर्मचारी देखील येतात. या जवळपास ४१ लाख कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. आधी जवळच्या ईएसआयसी केंद्रावर जाऊन आजारपणाची माहिती द्यावी लागत होती. त्यानंतर तेथील डॉक्टर तपासून त्या रुग्णाला खासगी हॉस्पिटलमध्ये पाठवत होते. मात्र, गंभीर असलेल्या पेशंटला याचा त्रास होत होता. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
या कर्मचाऱ्यांच्या पगारातील काही रक्कम ईएसायसीला जाते. यामुळे ते आरोग्य विम्याचे लाभार्थी होतात. अशा कामगारांना इन्शुअर्ड पर्सन म्हटले जाते. कंपनी कर्मचाऱ्याच्या पगारातील 0.75 टक्के आणि कंपनीकडून 3.25 टक्के रक्कम ESIC मध्ये जमा करते. याबदल्यात कर्मचाऱ्याला आरोग्य विमा आणि कॅश बेनिफिट दिले जातात.
कामगार संघटना समन्वय समितीचे महासचिव एस पी तिवारी यांनी सांगितले की, बोर्डाची शुक्रवारी बैठक झाली. यामध्ये गंभीर परिस्थितीमध्ये दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास परवानगी देताना यासाठीही ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये प्रथम दाखविण्याची अट रद्द करण्यात आली आहे. हृदयविकारासारख्या तातडीच्या अत्यवस्थ परिस्थतीत हा निर्णय लागू होणार आहे.
हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाला तातडीच्या उपचाराची गरज भासते. ईएसआयसीचे लाभधारक ईएसआयसीमध्ये येणाऱ्या किंवा अन्य कोणत्याही खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकतात. मात्र, पॅनेलमध्ये असलेल्या हॉस्पिटलमध्येच उपचार हे कॅशलेस होणार आहेत. अन्य खासगी हॉस्पिटलमध्ये बिल आधी भरावे लागणार असून परताव्यासाठी नंतर क्लेम करावा लागणार आहे. यामध्ये मिळणारी रक्कम ही केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा (सीजीएचएस) ने ठरवून दिलेल्या दरा प्रमाणेच असणार आहे. सध्या १० किमीच्या अंतरावर कोणतेही ईएसआयसी किंवा खासगी हॉस्पिटल नसेल तर गैर खासगी हॉस्पिटलमध्ये देखील उपचार घेण्याची परवानगी दिलेली आहे.