देशात २६५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 10:00 PM2020-03-13T22:00:00+5:302020-03-13T22:00:02+5:30
उत्पादन घटूनही ६० लाख टन साखर राहणार शिल्लक
पुणे : देशात आत्तापर्यंत २१० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, हंगामाच्या अखेरीस २६५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशांतर्गत उत्पादन ६४ लाख टनांनी घटणार आहे. मात्र, गेल्या दोन हंगामांत झालेल्या विक्रमी साखर उत्पादनामुळे ५५ ते ६० लाख टन साखर शिल्लक राहील, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
उसाची उपलब्धता कमी असल्याने देशभरातील ४५३ कारखाने सुरू झाले होते. गेल्या वर्षी ५२० कारखाने गाळप हंगामामध्ये सहभागी झाले होते. तर, गेल्या हंगामामध्ये देशात ३३१ लाख टन साखर उत्पादित झाली. यंदा १३ मार्चअखेरीस २१० लाख टन साखर उत्पादित झाली असून, गतवर्षीपेक्षा उत्पादन ५७ लाख टनांनी घटले आहे.
उत्तर प्रदेशाने ८३ लाख टन साखरेचे उत्पादन करून पुन्हा आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रात ५५ लाख टन साखर उत्पादित झाली असून, गतवर्षीपेक्षा उत्पादनामधे ४३ लाख टनांनी घट आहे. कर्नाटकामधे ३३ लाख टन साखर उत्पादन झाले असून, तेथे ९ लाख टनांनी उत्पादन घटले आहे. गुजरातमध्ये ८ लाख टन साखर उत्पादन झाले असून, त्यातही गतवर्षीच्या तुलनेत अडीच लाख टनांनी घट असल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले.
देशातील उत्पादनाची स्थिती पाहता, यंदा २६५ लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज आहे. त्यात उत्तर प्रदेश ११८, महाराष्ट्र ६०, कर्नाटक ३४ आणि गुजरातमधे ९ लाख टन उत्पादन होईल. यंदा हंगामाच्या सुरुवातीला तब्बल १४५ लाख टन साखर शिल्लकी होती. राखीव साठा योजनेमधील ४० लाख टन व अपेक्षित ५० लाख टनांची निर्यात लक्षात घेता, हंगामाच्या अखेरीस ५५ ते ६० लाख टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साखरेचे आंतरराष्ट्रीय दर कोसळले आहेत. या संकटामुळे निर्यातीमधे घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
.....................
साखर निर्यातीवर कोरोनाचा प्रभाव
साखरेचे स्थानिक बाजारातील दर टिकून राहण्यासाठी किमान ५० लाख टन साखरेची निर्यात होणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत ३५ लाख टन निर्यातीचे करार झाले असून, त्यातील २२-२३ लाख टन साखर निर्यात झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्यातीवर परिणाम होण्याची भीती आहे.