एटीएममधून निघाल्या 100 ऐवजी 500 च्या नोटा; अवघ्या काही तासांत एटीएम खळखळाट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 10:06 PM2017-07-27T22:06:12+5:302017-07-28T01:45:42+5:30
राजस्थान येथील भरतपूरमध्ये एका एटीएममधून पैसे काढणाऱ्यांना जणू लॉटरीच लागल्याची घटना घडली. येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून 100 रुपयांच्या ऐवजी 500 रुपये निघत होते.
जयपूर, दि. 27 - राजस्थान येथील भरतपूरमध्ये एका एटीएममधून पैसे काढणाऱ्यांना जणू लॉटरीच लागल्याची घटना घडली. येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून 100 रुपयांच्या ऐवजी 500 रुपये निघत होते. ही बातमी वा-यासारखी गावात पसरली आणि त्या एटीएमबाहेर लोकांच्या रांगाच रांगा लागल्या. दरम्यान, या घटनेची माहिती बॅंकेला समजली असता बॅंक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत एटीएम खळखळाट झाले. अवघ्या तासभरात जवळपास 250 लोकांनी 2 लाख रुपये या एटीएममधून काढून नेले.
भरतपूरमधील डीग गावातील अॅक्सिस बँकेच्या या एटीएममध्ये ही घटना 24 जुलै रोजी घडली. येथील नई सडक मार्गावरील अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून लोक जेव्हा पैसे काढत होते तेव्हा 100 रुपयांऐवजी त्यांना 500 रुपयांच्या नोटा मिळाल्या. त्यामुळे पैसे काढणा-यांना पाचपट जास्त रक्कम मिळत असल्याने सुरुवातीला आश्चर्य वाटले. त्यानंतर अधिक पैसे मिळत असल्याच्या आनंदात त्यांनी तासांभरात एटीएमच रिकामी केले. या घटनेनंतर आता बँकेचे कर्मचारी एटीएममधून पैसे काढणाऱ्या लोकांचे पत्ते शोधून त्यांना पैसे परत करण्याची विनंती करत आहेत. तसेच, पैसे काढणारे वेगवेगळ्या बॅंकाचे खातेधारक असल्यामुळे बॅक कर्मचा-यांना अडचणी येत आहेत. तर, काही लोकांनी पैसे परत देण्यास नकार दिला आहे. तर, रामराज नावाच्या व्यक्तीने त्यांना 16 हजार रुपये परत केले आहेत. त्यांना या एटीएममधून 4 हजारच्या ऐवजी 20 हजार रुपये मिळाले होते.
दरम्यान, अॅक्सिस बॅंकेच्या डीग येथील शाखेचे मॅनेजर विपुल खंडेलवाल यांनी सांगितले की, एटीएमध्ये चुकीमुळे 100 रुपयांच्या सेल्फमध्ये 500 रुपयांच्या नोटा भरण्यात आल्या, त्यामुळे ही घटना घडली.