लोकसभेतून महुआ मोइत्रांचे निलंबन निश्चित? नैतिकता समितीकडून प्रस्ताव पास; अहवालही स्वीकारला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 17:48 IST2023-11-09T17:42:39+5:302023-11-09T17:48:17+5:30
TMC MP Mahua Moitra News: नैतिकता समिती आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे पाठवणार असल्याचे सांगितले जात आहे.

लोकसभेतून महुआ मोइत्रांचे निलंबन निश्चित? नैतिकता समितीकडून प्रस्ताव पास; अहवालही स्वीकारला
TMC MP Mahua Moitra News: संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपात लोकसभेच्या नैतिकता समितीपुढे तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांची चौकशी करण्यात होती. महुआ मोइत्रा यांनी लोकसभेत अदानी समूहाला लक्ष्य करणारे प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच आणि किंमती भेटवस्तू घेतल्याचा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता. यासंदर्भात नैतिकता समितीची एक महत्त्वाची बैठक झाली असून, त्यामध्ये यासंबंधी मसुदा अहवाल स्वीकारल्याचे वृत्त आहे. तसेच महुआ मोइत्रा यांना लोकसभेतून निलंबित करावे, अशी शिफारस नैतिकता समितीने केल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप खासदार विनोदकुमार सोनकर यांच्या अध्यक्षतेखालील नैतिकता समितीची बैठक झाली. या बैठकीत अहवाल स्वीकारण्यात आला. अहवालाच्या बाजूने ६ तर विरोधात ४ जणांनी मतदान केले. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी काँग्रेस खासदार परिणीत कौर यांनी अहवालाच्या समर्थनार्थ मतदान केले. नैतिकता समितीचा मसुदा अहवाल पक्षपाती आणि चुकीचा आहे, अशी टीका या विरोधात मतदान करणाऱ्या चार सदस्यांनी केली आहे. नैतिकता समिती सदर अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पाठवण्यात येणार आहे.
महुआ मोइत्राचे लोकसभेतून निलंबन करा
महुआ मोइत्राचे लोकसभेतून निलंबन करा, अशी शिफारस समितीने केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. महुआ मोइत्रा यांच्यावरील आरोपांबाबत समितीने अहवाल तयार केला आहे. या अहवालावर बैठकीत चर्चा होऊन तो स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. समितीच्या सहा सदस्यांनी अहवाल स्वीकारण्याचे समर्थन केले तर चार सदस्यांनी विरोध केला. आता पुढील कारवाईसाठी हा अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. यासंदर्भात समितीचे अध्यक्ष विनोदकुमार सोनकर यांनी माहिती दिली.
दरम्यान, मसुदा अहवालात मोईत्रा यांच्या वर्तनाचा निषेध करण्यात आल्याचे वृत्त आहे. या नैतिकता समितीमध्ये १५ सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे सात, काँग्रेसचे तीन आणि बसपा, शिवसेना, वायएसआर काँग्रेस पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय-एम) आणि जनता दल (युनायटेड) यांच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे.