नाझीवादी असतो तर जनतेनं निवडून दिलं नसतं, EU खासदारांचा ओवैसींवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 12:56 PM2019-10-30T12:56:36+5:302019-10-30T12:56:50+5:30
कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळानं काल जम्मू-काश्मीरचा दौरा केला.
नवी दिल्लीः कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळानं काल जम्मू-काश्मीरचा दौरा केला. यावेळी शिष्टमंडळाच्या सदस्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर भारतात अफरातफर माजली होती. त्यानंतर या शिष्टमंडळानं जम्मू-काश्मीरचा दौरा करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी EU खासदारांवर निशाणा साधला होता.
ओवैसी ट्विट करत म्हणाले होते, काश्मीर खोऱ्यात जाण्यासाठी चांगल्या खासदारांची निवड केलेली आहे, जे इस्लामोफोबिया किंवा नाझी प्रेमी आहेत. मुस्लिमबहुल भागात यांना पाठवण्यात येणार आहे. त्यावेळी शेरो शायरी करत त्यांनी टीकाही केली होती. गैरों पर करम, अपनों पर सितम, ऐ जान ए वफा ये जुल्म ना कर, रहने दे अभी थोड़ा सा धर्म’, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारला चिमटा काढला होता.
त्यानंतर आता EU खासदारांनीच ओवैसींवर पलटवार केला. पत्रकार परिषदेत जेव्हा त्यांना यासंदर्भात विचारण्यात आलं तेव्हा ते भडकले आणि म्हणाले, आम्ही नाझी प्रेमी नाही. जर असतो तर जनतेनं निवडून दिलं नसतं. आम्ही इथे राजकारण करण्यासाठी आलेलो नाही. खरी परिस्थिती पाहण्यासाठी आलो आहोत. ओवैसींनी अशा प्रकारचं विधान केल्यानं ते खासदार प्रचंड भडकलेले होते. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये शांतता नांदत असल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत आणि पाकिस्ताननं एकमेकांबरोबर चर्चा केली पाहिजे, चर्चेतूनच या प्रश्नावर तोडगा निघू शकतो. तसेच कलम 370 हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचंही EU खासदार म्हणाले आहेत.