Coronavirus: ‘लॉकडाऊन’नंतरही जनजीवन टप्प्याटप्प्याने सुरळीत होऊ द्या; मोदींची मुख्यमंत्र्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 02:30 AM2020-04-03T02:30:14+5:302020-04-03T06:36:58+5:30
राज्यांनी ‘लॉकडाऊन’नंतरही जनजीवन पूर्ववत करताना परस्परांशी समन्वय ठेवायला हवे.
नवी दिल्ली : जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची स्थिती अजूनही समाधानकारक नाही व ही साथ पुन्हा उफाळून येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे सध्याचा देशव्यापी ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतरही राज्यांनी लोकांची गर्दी आणि दाटीवाटीला एकदम वाव न देता जनजीवन टप्प्प्याटप्प्याने सुरु करावे, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केली.
कोरोना रोखण्याचे प्रयत्न व ‘लॉकडाऊन’चे पालन समाधानकारक असले तरी आणखी सतर्कता व शिस्त पाळण्यावर भर देऊन मोदी यांनी म्हणाले की, देशाचे दैनंदिन जनजीवन राज्यांच्या सीमांपुरते मर्यादित नसून परस्परावलंबी आहे. राज्यांनी ‘लॉकडाऊन’नंतरही जनजीवन पूर्ववत करताना परस्परांशी समन्वय ठेवायला हवे. सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने बैठक घेऊन मोदींनी ‘लॉकडाऊन’चा तसेच त्यानंतरच्या काळातही कराव्या लागणाऱ्या उपायांचा आढावा घेतला.
राज्यांनी सूचना कराव्यात
सर्वच मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यांतील स्थितीची माहिती दिली व बहुतांश मुख्यमंत्र्यांनी निधीची तसेच साधनसामुग्रीची अजचण येत असल्याने केंद्राकडून मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. यासाठी ‘लॉकडाऊन’मधून बाहेर पडण्याचे कसे आणि कोणते सामायिक धोरण आखता येईल यावर साकल्याने विचार करून राज्यांनी सूचना कराव्यात, असेही पंतप्रधानांनी सूचविले.