सर्जिकलनंतरही खो-यात अतिरेक्यांचे थैमान, हिंसाचारात मृत्यू होण्याचे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 02:26 AM2017-09-30T02:26:53+5:302017-09-30T02:27:07+5:30
पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या वर्षी भारताच्या लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाशी संबंधित हिंसाचारात मृत्यू होण्याचे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढले आहे.
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या वर्षी भारताच्या लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाशी संबंधित हिंसाचारात मृत्यू होण्याचे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढले आहे. नवी दिल्लीतील इन्स्टिट्यूट फॉर कॉनफ्लिक्ट मॅनेजमेंटच्या वतीने चालवल्या जात असलेल्या साऊथ अशिया टेररिझम पोर्टलच्या (एसएटीपी) माहितीचे इंडियास्पेन्डने केलेल्या विश्लेषणात म्हटले आहे की, दहशतवादाशी संबंधित मृत्यू २०१५-२०१६मध्ये २४६ होते तर २०१६-२०१७मध्ये (२४ सप्टेंबर २०१७पर्यंत) ३२३ होते.
याचाच अर्थ असा की, सर्जिकल स्ट्राइक्सनंतर जम्मू आणि
काश्मीरमध्ये घुसखोरी व दहशतवादी हल्ले याचे प्रमाण कमी झाले नसून, त्यात वाढच झाली आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी गरज भासली तर आणखी सर्जिकल स्ट्राइक्स होऊ शकतात, असे संकेत मध्यंतरी दिले. पण त्यानंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही.
आम्हाला काय म्हणायचे आहे याचा संदेश सर्जिकल स्ट्राइकद्वारे त्यांना दिला गेला आणि तो त्यांना समजलाही, असे रावत २५ सप्टेंबर २०१७ रोजी म्हणाले होते. रावत म्हणाले होते की, ‘‘पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण छावण्या सुरूच असल्यामुळे भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी सुरू आहे.’’
प्रसारमाध्यमांतील वृत्तान्तांवरून एसएटीपीने ही मृत्यूबद्दलची माहिती गोळा केली असून, ती २४ सप्टेंबरपर्यंतची आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार मारण्याच्या प्रमाणात २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१५-२०१६मध्ये १५७ दहशतवादी ठार मारले होते तर १९४ जणांना २०१६-२०१७मध्ये ठार मारण्यात आले.
- दहशतवादाशी संबंधित हिंसाचारात सुरक्षा दलांचे जवान मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण २०१५-२०१६मध्ये ७० होते तर २०१६-२०१७मध्ये ७७ जवान ठार झाले. दहशतवादाशी संबंधित हिंसाचारात नागरिक मरण पावण्याचे प्रमाण २०१६-२०१७मध्ये ५२ होते तर २०१५-२०१६मध्ये १० नागरिक ठार झाले होते.