...तर दिल्लीतही मिळणार नाही रुग्णांना खाटा!, केजरीवाल यांनी केली लॉकडाऊन घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 01:33 AM2021-04-16T01:33:53+5:302021-04-16T07:14:09+5:30
Kejriwal announces lockdown : दिल्लीत बुधवारी १७ हजारांवर रुग्णांची नोंद झाली, तर शंभरावर रुग्णांचा मृत्यू झाला. दररोज दोन ते चार हजार रुग्णांची भर पडत आहे. दीड महिन्यांपूर्वी दिल्लीत एक ते पाच रुग्णांचा मृत्यू होत होता.
नवी दिल्ली : दिल्लीत ज्या वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे ती गती कायम राहिली तर येत्या आठवड्याभरातच रुग्णांना रुग्णालयात खाटा मिळणार नाहीत. दिल्लीत कोरोना रोखण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांंनी शुक्रवारी रात्रीपासून तर सोमवारी सकाळपर्यंत दिल्लीत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
दिल्लीत बुधवारी १७ हजारांवर रुग्णांची नोंद झाली, तर शंभरावर रुग्णांचा मृत्यू झाला. दररोज दोन ते चार हजार रुग्णांची भर पडत आहे. दीड महिन्यांपूर्वी दिल्लीत एक ते पाच रुग्णांचा मृत्यू होत होता. केजरीवाल म्हणाले, लॉकडाऊनच्या विरोधात मी आहे. परंतु, स्थिती पाहता लॉकडाऊन शिवायपर्याय नाही. यामुळे रुग्ण कमी होतील, असे नाही तरी ज्या गतीने दिल्लीत दररोज हजारो रुग्ण येत आहेत ती गती मंदावू शकते. दिल्लीतील रुग्णालये भरलेली असली तरी आज पाच हजार खाटा आणि ५०० आयसीयू बेड्स रिक्त आहेत. अनेक बँक्वेट हॉल रुग्णांलयांशी जोडण्यात आले आहेत. दिल्लीतील प्रत्येक रुग्णाला आरोग्य सेवा मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुुरू आहेत. परंतु, लोकांनीही नियमांचे पालन करावे.
केजरीवाल यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतल्यानंतर यासंबंधी घोषणा केली.
प्लाझ्मा दान करा !
दिल्लीतील रुग्णांना प्लाझ्मा मिळत नाही. केजरीवाल सरकारने प्लाझ्मा बँक सुरू केली असली तरीही प्लाझ्मा दाते नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. केजरीवाल यांनी प्लाझ्मा दान करण्याचे दुरुस्त झालेल्या रुग्णांना आवाहन केले आहे.