'ईडी' आणि 'सीबीआय'देखील नितीश कुमारांना रोखू शकली नाही; उद्धव ठाकरे म्हणाले आगे बढो!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 09:21 AM2022-08-11T09:21:43+5:302022-08-11T09:23:00+5:30
महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे, भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे.
मुंबई - महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीच्या सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. तर, विरोधी बाकावर असलेली भाजप सत्ता काबिज करण्यात यशस्वी झाली. मात्र, बिहारमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला नितीशकुमार यांनी धक्का दिला अन् भाजप एका रात्रीतून सत्तेबाहेर फेकली गेली. देशातील राजकीय वर्तुळात केंद्रबिंदू ठरलेल्या या दोन्ही घटना देशातील भविष्याची दिशा ठरवतील, असं सांगण्यात येत आहे. त्यातच, नितीशकुमार यांच्या बंडाला आता उद्धव ठाकरेंनीही फुल्ल सपोर्ट दिला आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून नितीशकुमार यांच्यावर स्तुतीसुमने उधळत, नितीशकुमार आगे बढो... असे शिवसेनेनं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे, भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष टोकाला गेला. त्यातच, बिहारमधील राजकीय उलथापालथीचं शिवसेनेनं समर्थन केलं आहे. नितीश कुमार यांनी सध्या तरी एक वावटळ निर्माण केली. त्याचे वादळ झाले तर आव्हानाची स्थिती निर्माण होईल. 'ईडी' आणि 'सीबीआय'देखील नितीश कुमारांना रोखू शकली नाही. तेजस्वी यादवही बेधडक आहेत. अहंकाराच्या भिंती जनताच तोडते. बिहारात त्या तुटल्या. महाराष्ट्रातही उद्ध्वस्त होतील. बिहारात नितीश कुमारांनी एक पाऊल टाकले. त्यांच्या मागे असंख्य पावले उमटू द्या. नितीश कुमार आगे बढो! भविष्यात तुम्हाला हजारोंची साथ नक्की मिळेल. राजकारणात कोणीच कायमचा संपत नसतो हे खरेच; पण याला संपवू आणि त्याला संपवू अशा वल्गना करणाऱ्यांचे अस्तित्व नष्ट झाल्याचा इतिहास आहे! समझने वालों को इशारा काफी है!, अशा शब्दात शिवसेनेनं मुखपत्रातून भाजपला लक्ष्य करत नितीश कुमारांना खो देण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपवरच उलटला डाव
बिहारात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ झाली आहे. बिहारातदेखील महाराष्ट्राप्रमाणेच 'शिंदे' गट वेगळा करून भाजपचे दिल्लीश्वर नितीश कुमार यांना मात देण्याचे कारस्थान करीत होते. त्यासाठी नितीश कुमार यांचे 'शिंदे' आर.सी.पी. सिंग यांना हाताशी धरून पोखरापोखरीचे काम सुरूच केले होते, पण नितीश कुमार यांनी भाजपलाच धोबीपछाड देणारी पलटी मारली आहे. बिहारात भाजपबरोबरची युती तोडल्याचे 'जेडीयू'ने मंगळवारी जाहीर केले. नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे मंगळवारी राजीनामा सोपवला. बुधवारी नितीश यांनी मुख्यमंत्रीपदाची तर 'राजद'चे तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या नव्या 'महागठबंधन' सरकारमध्ये जदयू, राष्ट्रीय जनता दल, काँग्रेससह इतर घटक पक्षांचा सहभाग आहे. भारतीय जनता पक्ष विश्वासघातकी असल्याचे मत 'जेडीयू'ने व्यक्त केले. भाजप नितीश कुमार यांच्या पक्षालाच सुरुंग लावायला निघाला, पण तो खेळ भाजपवर उलटला आहे.
बिहारचे एकनाथ शिंदे. आर.पी सिंग
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा लांबलेला पाळणा थोडा हलू लागला असतानाच बिहारात त्यांच्या सत्तेच्या पाळण्याची दोरीच तुटली. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीयू युती होती, पण निवडणुकीत नितीश कुमारांचे उमेदवार पाडण्याचा उद्योग भाजपने केला. त्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमारांच्या 'जेडीयू'ला भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या व भाजपने मेहरबानी खात्यात नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिले असे चित्र निर्माण केले. केंद्रीय मंत्रिमंडळात 'जेडीयू'चे राज्यसभा सदस्य आर.सी.पी. सिंग यांचा समावेश नितीश कुमार यांच्या मनाविरुद्ध होता, पण सिंग यांना बळ देऊन भाजपास बिहारात नितीश कुमारांना अस्थिर करायचे होते. हे लक्षात येताच नितीश कुमार यांनी दिल्लीशी संपर्कच तोडला. दिल्लीशिवाय आपले काही अडत नाही हे दाखवले व मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या किमान पाच बैठकांना गैरहजर राहिले.