विक्री कराराने ताबा घेतला तरी जागेची मालकी नाही, नोंदणीकृत खरेदी-विक्री खत आवश्यक: सर्वोच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 06:56 IST2025-01-20T06:56:37+5:302025-01-20T06:56:47+5:30
Supreme Court: नोंदणी कायद्याप्रमाणे नोंदणीकृत विक्रीपत्र नसेल तर मालमत्तेची मालकी मिळत नाही. विक्रीचा करार करून खरेदीदारास ताबा दिला तरी खरेदीदार जागेचा मालक ठरत नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

विक्री कराराने ताबा घेतला तरी जागेची मालकी नाही, नोंदणीकृत खरेदी-विक्री खत आवश्यक: सर्वोच्च न्यायालय
- डॉ. खुशालचंद बाहेती
नवी दिल्ली - नोंदणी कायद्याप्रमाणे नोंदणीकृत विक्रीपत्र नसेल तर मालमत्तेची मालकी मिळत नाही. विक्रीचा करार करून खरेदीदारास ताबा दिला तरी खरेदीदार जागेचा मालक ठरत नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
एम. ए. शण्मुगम यांनी ३१ ॲाक्टोबर २०११ रोजी इंडियन ओव्हरसीज बँकेला आपली मालमत्ता विकण्याचा करार केला. करारानुसार बँकेने पुर्ण मुआइजा दिला आणि शण्मुगम यांनी जागेचा ताबा बॅंकेला दिला. दरम्यान, वर्षभरात अचानक शण्मुगम यांचे निधन झाले आणि नोंदणीकृत विक्री राहुन गेली. मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी ती मालमत्ता दुसऱ्याला विकली.
बँकेने वारसांच्या विक्री विरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे अर्ज दिला. न्यायाधिकरणाने बँकेचा मालमत्तेवर दीर्घकाळ ताबा आहे. बँकेने ठरलेला पुर्ण मुवायजा दिला आहे. त्यांच्या निधनामुळे नोंदणीकृत विक्री होऊ शकली नाही म्हणून जागेवर बँकेचीच मालकी आहे. वारसदारांनी केलेली विक्री बँकेवर बंधनकारक नाही, असा निर्णय दिला. शण्मुगम यांच्या वारसांनी न्यायाधिकरणाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. सुप्रीम कोर्टाने न्यायाधिकरणाचा आदेश रद्द केला.
कोणत्याही स्थावर मालमत्तेची मालकी विक्री कराराने खरेदीदाराच्या नावे हस्तांतरित होत नाही. मालमत्ता हस्तांतरण कायदा, १८८२ नुसार १०० रुपयापेक्षा जास्त किमतीची स्थावर मालमत्ता रीतसर नोंदणीकृत विक्री दस्तऐवज करूनच विकली जाऊ शकते. विक्री करार करून ताबा घेतला तरी खरेदीदाराचा मालमत्तेत मालकीहक्क निर्माण होत नाही.
- न्यायमूर्ती अभय एस. ओक आणि उज्जल भुयान