दृष्टी गेली तरी तेवत ठेवले ज्ञानाचे अग्निहोत्र; महापंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 07:28 AM2024-02-18T07:28:54+5:302024-02-18T07:29:03+5:30
२०२३ सालासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेले जगद्गुरू रामभद्राचार्य हे संस्कृत महापंडित असून त्यांनी आजवर अनमोल अशी साहित्यसेवा केली आहे.
नवी दिल्ली : २०२३ सालासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेले जगद्गुरू रामभद्राचार्य हे संस्कृत महापंडित असून त्यांनी आजवर अनमोल अशी साहित्यसेवा केली आहे. ते दोन महिन्यांचे असताना दुर्दैवाने दृष्टिहीन झाले, पण त्याने खचून न जाता त्यांनी आयुष्यभर ज्ञानाचे अग्निहोत्र सतत तेवत ठेवले आहे. संस्कृत भाषेच्या शिक्षणातून त्यांनी भारतीय संस्कृतीची मूल्ये सर्व जगाला समजावून सांगण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.
उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथे राहणारे जगद्गुरू रामभद्राचार्य यांचा जन्म १९५० साली झाला. ते रामानंद संप्रदायाचे असून त्यांनी चित्रकूट येथे संत तुलसीदास यांच्या नावे तुलसी पीठ या धार्मिक व सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे. ते सध्या या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या जगद्गुरू रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांनाच शिक्षण दिले जाते. तिथे त्यांच्यासाठी पदवी अभ्यासक्रम चालविण्यात येतात.
अफाट स्मरणशक्तीची मिळाली देणगी
• जगद्गुरू रामभद्राचार्य यांचे मूळ नाव गिरिधर मिश्र असून त्यांनी जौनपूर येथील आदर्श गौरीशंकर संस्कृत महाविद्यालयात औपचारिक शिक्षण घेतले आहे.
■ तिथे त्यांनी संस्कृत, हिंदी, इंग्रजी, गणित, भूगोल, इतिहास या विषयांचा अभ्यास केला. एकदा गोष्ट ऐकली की, ती कायमची लक्षात ठेवण्याची अफाट स्मरणशक्ती त्यांना लाभली आहे.
त्यामुळे ते कधीही ब्रेल लिपी शिकले नाहीत किंवा लेखनासाठी अन्य साधनांचा आधार घेतला नाही. जे शिकले ते त्यांनी लक्षात ठेवले व त्याआधारे अनेक पुस्तकेही लिहिली.
ईश्वराच्या सगुण, निर्गुण रुपाबद्दल केले विवेचन
संयुक्त राष्ट्रांच्या वतीने आयोजित विश्व शांती शिखर संमेलनात जगद्गुरू रामभद्राचार्य यांचा समावेश होता. भारत व हिंदू या शब्दांची संस्कृत व्याख्या तसेच ईश्वराचे सगुण, निर्गुण रूप या मुद्द्यांविषयी त्यांनी या संमेलनातील आपल्या भाषणात विवेचन केले होते.
शंभरावर पुस्तके लिहिली
• जगद्गुरु रामभद्राचार्य हे २२ भाषांमध्ये पारंगत आहेत. त्यांनी संस्कृत. हिंदी, अवधी, मैथिलीसहित अनेक भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तसेच १०० हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
त्यामध्ये चार महाकाव्य (दोन संस्कृत व 3 दोन हिंदी भाषेतील), रामचरितमानसवर हिंदीतून केलेले भाष्य, अष्टाध्यायीबाबत काव्यात्मक संस्कृत ग्रंथ, प्रस्थानत्रयी (ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, प्रधान उपनिषदांवर संस्कृतमधून केलेले विवेचन) अशा अनेक पुस्तकांचा समावेश आहे.
संत तुलसीदास यांच्या काव्यावर ● अधिकारवाणीने बोलू शकणाऱ्या व्यक्तींमध्ये जगद्गुरू रामभद्राचार्य अग्रस्थानी आहेत. रामायण, महाभारतावरील रामभद्राचार्याच्या निरुपणाचे कार्यक्रम भारतातील अनेक देशांत तसेच विदेशांतही आयोजिण्यात आले होते.
● तसेच त्यांच्या निरुपणाचे कार्यक्रम विविध वाहिन्यांवरही प्रसारित होत असतात. त्यांना २०१५ साली केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.