ऐन थंडीतही जानेवारी ठरला सर्वांत उष्ण महिना, 1940 नंतर सर्वाधिक तापमानाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 11:09 IST2025-02-07T11:08:03+5:302025-02-07T11:09:34+5:30
Global Warming News: २०२४ हे पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंद झाले आहे. अशातच २०२५ मध्ये जानेवारी महिन्यात आतापर्यतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.

ऐन थंडीतही जानेवारी ठरला सर्वांत उष्ण महिना, 1940 नंतर सर्वाधिक तापमानाची नोंद
नवी दिल्ली: 'ला निना'चा प्रभाव असूनही, जानेवारी महिन्यात १९४० नंतरचे सर्वाधिक विक्रमी तापमान नोंदविले गेले. युरोपियन हवामान संस्थेने गुरुवारी ही माहिती दिली. 'ला निना'मुळे जागतिक तापमान कमी होते.
२०२४ हे पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंद झाले आहे. अशातच २०२५ मध्ये जानेवारी महिन्यात आतापर्यतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तसेच जागतिक सरासरी तापमान औद्योगिकीकरणापूर्वीच्या पातळीपेक्षा १.५ अंश सेल्सिअसने वाढले आहे.
'सी३एस'नुसार...
कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस (सी३एस) नुसार, जानेवारी २०२५ मध्ये सरासरी १३.२३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, जे मागील सर्वांत उष्ण जानेवारी (२०२४) पेक्षा ०.०९ अंश जास्त आणि १९९१-२०२० च्या सरासरीपेक्षा ०.७९ अंश जास्त होते.
'ला निना'चा प्रभाव काय?
१ 'ला निना' ही एक हवामान पद्धत आहे जिथे मध्य प्रशांत महासागरातील पृष्ठभागावरील पाणी नेहमीपेक्षा थंड होते, ज्यामुळे जगभरातील हवामानावर परिणाम होतो.
ला निनाच्या प्रभावामुळे भारतात 3 जोरदार आणि मुसळधार पाऊस पडतो आणि त्याचबरोबर आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागात दुष्काळी स्थिती निर्माण होते. यामुळे जागतिक तापमान थोडे थंड होते, किंवा तापमान कमी होते. तर या उलट, 'एल निनो'ची घटना हवामान गरम करते, असे संशोधकांनी सांगितले.
जागतिक तापमान १.५ अंशांपेक्षा जास्त
शास्त्रज्ञांना असेही आढळून आले की जानेवारीमध्ये पृथ्वीचे तापमान औद्योगिकीकरणापूर्वीच्या पातळीपेक्षा १.७५ अंश सेल्सिअस जास्त होते. गेल्या १९ महिन्यांपैकी १८ महिन्यांत जागतिक तापमान १.५ अंशांपेक्षा जास्त राहिले. गेल्या १२ महिन्यांचा कालावधी (फेब्रुवारी २०२४ - जानेवारी २०२५) औद्योगिकीकरणापूर्वीच्या काळापेक्षा १.६१ अंश सेल्सिअस जास्त उष्ण होता. जानेवारीत समुद्राच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान २०.७८ अंश से. होते.