चीनला न जुमानता सैन्याचे सीमेवर तंबू सैनिकांना रसदपुरवठा करण्याचीही तयारी
By admin | Published: July 10, 2017 05:55 AM2017-07-10T05:55:49+5:302017-07-10T05:55:49+5:30
चीनच्या धमक्यांना न जुमानता सिक्कीम सीमेवरील डोकलाम भागात दीर्घकाळ घट्ट पाय रोवून राहण्याची तयारी भारताने केली
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : चीनच्या धमक्यांना न जुमानता सिक्कीम सीमेवरील डोकलाम भागात दीर्घकाळ घट्ट पाय रोवून राहण्याची तयारी भारताने केली असून, सैन्याने सीमेवर तंबू ठोकले आहेत. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी जोपर्यंत आपल्या सैनिकांना परत बोलवत नाही तोपर्यंत येथून हटणार नसल्याचे संकेतच भारताने यानिमित्ताने दिले आहेत. भारतीय सैन्याने ही भूमिका घेतली असताना चीननेही तडजोड करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सिमेवरील तणाव वाढला आहे.
भारत, चीन आणि भूतानच्या सीमा एकत्र येतात त्या डोकलाम भागावरून हा वाद सुरू आहे. या ठिकाणाहून भारताने सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी चीन करीत आहे. त्यामुळे सिक्कीम सेक्टरमध्ये १० हजार फूट उंचीवरील या भागात तणाव वाढत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सैनिकांना रसदपुरवठा करण्याचीही सोय करण्यात आली आहे.
भारतीय सैन्य चीनच्या कोणत्याही प्रकारच्या दबावात नसल्याचे हे संकेत आहेत. या वादावर राजनयिक तोडगा काढण्याचा आत्मविश्वासही व्यक्त केला जात आहे.
>इशारे आणि धमक्या
भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढत असताना संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते की, भारताची परिस्थिती आता १९६२ पेक्षा वेगळी आहे. त्यावर चीननेही प्रतिक्रिया देत स्पष्ट केले होते की, चीनही पूर्वीसारखा राहिलेला नाही, याची भारताने दखल घ्यावी.
डोकलाम भागात चीनने रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर या भागात तणाव वाढला आहे. या भागाला भारतात डोका ला नावाने संबोधले जाते. चीन याला आपला डोंगलांग भाग असल्याचे सांगत आहे. ३,४८८ कि.मी.च्या भारत-चीन सीमेपैकी २२० कि.मी.चा भाग सिक्कीमला लागून आहे.
काय आहे वाद? : डोकलाममध्ये चीन रस्त्याचे काम करत आहे. याच भागात भारत, चीन आणि भूतानच्या सिमा आहेत. भूतान व चीन या भागावर दावा करत आहेत. या वादात भारत भूतानच्या बाजूने आहे. त्यामुळे चीनचा संताप झाला आहे.
यंत्रणा आतापर्यंत निष्फळ : चीन आक्रमकपणे सांगत आहे की, आपण कोणत्याही तडजोडीसाठी तयार नाहीत आणि चेंडू भारताच्या कोर्टात आहे. येथील सुरक्षाव्यवस्थेचे असे मत आहे की, तणाव कमी करण्यासाठी एकतर्फी दृष्टिकोन असून चालत नाही. सीमा वाद सोडविण्यासाठी २०१२ मध्ये दोन्ही देशांनी एका यंत्रणेवर सहमती दर्शविली होती; परंतु ही यंत्रणा आतापर्यंत निष्फळ ठरलेली आहे. तीन आठवड्यांपासून येथे तणाव आहे.