'अदानींनी लोकलमध्ये छोट्या वस्तूही विकल्या'; पवारांनी यापूर्वीच सांगितला होता संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 05:29 PM2023-04-09T17:29:36+5:302023-04-09T17:52:19+5:30
काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी अदानी उद्योग समुहावरून भारतीय जनता पक्षाला संसदेसह सगळीकडे धारेवर धरले आहे.
मुंबई - अदानी उद्योग समुहात शेल कंपन्यांच्या माध्यमातून आलेले २० हजार कोटी रुपये कुठून आले? व हा पैसा कोणाचा? हे जाणून घेण्याचा देशातील जनतेला अधिकार आहे. राहुल गांधी यांनी ही मागणी लावून धरली असून काँग्रेस पक्षासह देशातील विविध राजकीय पक्षांनी अदानी घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून व्हावी अशी मागणी केलेली आहे. अदानी प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक झाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानींचे देशाच्या प्रगतीत योगदान असल्याचे म्हटल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. आता, शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रातही उद्योगपती गौतम अदानींची स्तुती केली होती, त्याचेही फोटो सोशल मीडियातून समोर येत आहेत.
काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी अदानी उद्योग समुहावरून भारतीय जनता पक्षाला संसदेसह सगळीकडे धारेवर धरले आहे. असे असताना शरद पवार यांनी त्याच उद्योगसमूहाचे समर्थन करावे, त्यांचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे असे म्हणावे याचा अर्थ काय समजायचा असे काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राहूल गांधी यांनी देशभर निर्माण केलेला टेंपो पवार यांच्या या वक्तव्याने कमी झाली अशीही अनेकांची भावना आहे. त्यातच, आता शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रातील पुस्तकातही त्यांनी गौतम अदानी यांच्या मेहनतीचं अन् कष्टाचं उदाहरण दिलंय.
''आवर्जून उल्लेख करावा लागेल, तो गौतम अदानी या नावाचा. अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा बोलबाला झाला आहे. या उद्योजकाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो आहे. कमालीचा कष्टाळू साधा! शून्यातून त्यानं आपलं आजचं साम्राज्य उभं केलं आहे. लोकलमध्ये काही छोट्या वस्तूंची विक्री करण्यापासून या माणसाच्या उद्योजकतेला सुरुवात झाली. यानंतर काही छोटे व्यवसाय सुरू करून गौतम यांनी काही पैसे गाठीला बांधले. मग तो हिऱ्यांच्या व्यवसायात पडला. तिथेही पैसे मिळत होते, पण गौतम यांना त्याच्यात रस नव्हता. पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या उद्योगात पडण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. यामधल्या काळात त्यांनी बंदर उभारणीचा पुष्कळ अभ्यास केला. गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेलांचे आणि त्यांचे चांगले संबंध होते. त्यांनी चिमणभाईंकडे गुजरातमधलं मुंद्रा बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला. मुंद्रा वाळवंटी भागातलं बंदर आहे. तिथून पाकिस्तानची सीमारेषा नजीक आहे. या वस्तुस्थितीची जाणीव चिमणभाईंनी गौतम यांना दिली. गौतम यांनी प्रतिकूल परिस्थितीतही हे शिवधनुष्य पेललं.आज पन्नास हजार एकर जमिनीवरचं हे बंदर देशातलं सर्वांत मोठं आणि अद्ययावत बंदर आहे,'' असे उदाहरण देत शरद पवार यांनी गौतम अदांनीच्या कामाचं आणि त्यांच्या जीवनप्रवासाचं कौतुक केलं होतं.
गोंदियातील कार्यक्रमातील आठवणही सांगितली
गौतम नंतर कोळसा पुरवण्याच्या व्यवसायातही आले. मी गौतमना सुचवलं, 'वीज प्रकल्पांसाठी कोळसा पुरवण्याबरोबर ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रातही तुम्हीच उतरा.' एकदा प्रफुल्ल पटेल यांच्या वडलांच्या स्मृतिदिनानिमित्त गोंदिया इथे गौतम आणि मी एकत्र होतो. त्या वेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी, भंडारा जिल्ह्यात उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी शरद पवार यांनी मदत करावी, अशी भावना व्यक्त केली. मी म्हणालो, "उद्योग येतील, पण तुम्हालाही सहकार्य करावं लागेल. आज गौतम अदानी आले आहेत. त्यांना मी विनंती करतो, की ऊर्जानिर्मितीसाठी या परिसरात त्यांनी प्रकल्प उभा करावा.' गौतमनीही त्यांच्या भाषणात माझ्या विनंतीला विधायक प्रतिसाद दिला. सर्वसाधारणपणे व्यासपीठांवरच्या वक्तव्यांतून फार काही घडतंच असं नाही.. पण गौतमनी हा विषय लावून धरला. त्यानं भंडाऱ्यात ऊर्जानिर्मिती प्रकल्प मार्गी लावला. प्रकल्प पूर्ण झाल्यावर तेथून तीन हजार मेगावॅट वीजनिर्मिती होईल. गौतम यांनी ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली. आज जवळपास बारा हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे त्यांचे प्रकल्प उभारणीच्या प्रक्रियेत आहेत.
अदानी चौकशीबाबत पवारांचा खुलासा
अदानींवर टीका करणे योग्य नाही, असे मी बोललो नाही. एक काळ असा होता आम्ही कोणालाही टार्गेट करायचे असेल तर टाटा-बिर्ला यांचे नाव घेत होतो. टाटा यांचे देशासाठी योगदान आहे. तसेच अंबानी अदानी यांचेही देशासाठी योगदान आहे. ते लक्षात घेतले पाहिजे. त्यापेक्षा मला वाटते आमच्यासमोर दुसरे विषय खूप महत्वाचे आहेत. यात बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या समस्या हे विषय आहेत. या देशातील लोकांसमोर उभ्या असलेल्या समस्या आहेत. विरोधकांनी त्यावर लक्ष दिले पाहिजे. याहून जास्त अदानींवर बोलण्याची गरज आहे असे मला वाटत नाही, असे पवार म्हणाले.