‘कवच’ही रोखू शकले नसते अपघात; ‘कोरोमंडल’च्या लोको पायलटला ‘क्लीन चिट’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 05:21 AM2023-06-05T05:21:43+5:302023-06-05T05:22:32+5:30
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितला घटनाक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ओडिशातील किमान २७५ प्रवाशांचा बळी घेणाऱ्या तिहेरी रेल्वे अपघातात चालकाची चूक किंवा यंत्रणा अपयशी ठरली नाही, असे सांगून रेल्वे अधिकाऱ्यांनी कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चालकाला एकप्रकारे क्लीन चिट दिली. हा अपघात फक्त एकाच रेल्वेचा झाला, ‘कवच’ यंत्रणा कुचकामी ठरली असती. रेल्वे वेगात असल्याने प्रतिक्रिया वेळ खूपच कमी होता, त्याला अपयश म्हणणे योग्य होणार नाही, असे रेल्वे मंडळाच्या अधिकारी जया सिन्हा म्हणाल्या.
वर्मा यांनी सांगितले, की बहनगा बाजार रेल्वेस्थानकावर ‘लूप लाइन’वर लोहखनिजाने भरलेल्या मालगाड्या होत्या. दोन्ही मुख्य मार्गांवर सिग्नल हिरवा होता. म्हणजेच, निर्धारित वेगमर्यादेने गाडीच तो चालवू शकत होता. कोरोमंडल एक्स्प्रेस १२८ किमी प्रतितास आणि दुसरी पॅसेंजर १२६ किमी प्रतितास वेगाने जात होती. निर्धारित कमाल मर्यादा १३० किमी प्रतितास असल्याने निर्धारित वेगाचे उल्लंघन चालकाकडून झालेले नाही.
प्रियजनांना शोधण्याचे अवघड काम
बहनगा हायस्कूलमध्ये मृत प्रवाशांचे फाेटाे असे ठेवण्यात आले होते. ते पाहून नातेवाईक आपल्या आप्तेष्टांची ओळख पटवीत आहेत. तेथे एक जोडपे आपल्या २२ वर्षांच्या तरुण मुलाचा शोध घेण्यासाठी रेल्वे अपघातातील मृतांचे फोटो काळजावर दगड ठेवून पाहत होते. फोटोतील मृताच्या गळ्यात असलेल्या लॉकेटमुळे तो आपलाच मुलगा असल्याची मातेला खात्री पटली आणि इतक्या वेळ रोखून धरलेले अश्रू वाहू लागले.
सध्या फक्त प्राथमिक निष्कर्ष
सिग्नल यंत्रणा त्रुटीरोधक (एरर प्रूफ) आणि अपयशी न ठरणारी (फेल सेफ) आहे, म्हणजे यंत्रणेत बिघाड झाला तरी सर्व यंत्रणाच ठप्प होते आणि रेल्वे जेथे आहेत, तेथेच थांबतात, असे सिन्हा म्हणाल्या. हे फक्त प्राथमिक निष्कर्ष आहेत आणि औपचारिक चौकशी संपेपर्यंत ठोस काहीही सांगता येणार नाही, असे सांगत रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेमंत्र्यांचीच री ओढली.
तीन सख्खे भाऊ ठार, अख्खे कुटुंब उद्ध्वस्त
- कामाच्या शोधात तामिळनाडूला जाणाऱ्या पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील तीन भावांना बालासोर रेल्वे अपघातात आपला जीव गमवावा लागला.
- बसंती उत्तर येथील चरनिखली गावातील रहिवासी हरण गायन (४०), निशिकांत गायन (३५) आणि दिबाकर गायन (३२) हे वर्षातील बहुतांश वेळा तामिळनाडूत राहून छोटी-मोठी नोकरी करत असत. ते काही दिवसांपूर्वी घरी आले होते.
...अन् अर्धवट राहिली प्रेमाची कविता
- अपघाताच्या ठिकाणी बंगाली भाषेतील प्रेम कविता लिहिलेल्या डायरीतील कागदपत्रे रुळांवर अस्ताव्यस्त पसरलेली आढळली. डायरीच्या फाटलेल्या पानांवर ‘अल्पो अल्पो मेघ थेके हलका ब्रिस्ती है, छोटा छोटा गोलपो थेके भालोबासा सृष्टी आहे...’ विखुरलेल्या ढगांमुळे हलका पाऊस पडतो, (तर) आपण ऐकलेल्या छोट्या छोट्या कथांमधून प्रेम फुलते, असे हा कवी आपल्या कवितेत म्हणतो.
- आणखी एक अर्धवट कविता ‘भालोबेशी तोके चाय सारखों, अचिच तुझ मोनेर साथ...’ (प्रेमात मला तुझी गरज आहे, सदैव माझ्या मनात तू आहेस...). हा प्रवासी कवी असावा. मात्र, तो अपघातातून बचावला की काय, हे मात्र कळू शकले नाही.