तेव्हाचेही पंतप्रधान मणिपूरला गेले नव्हते; गृहमंत्री अमित शाह यांनी विराेधकांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 06:14 AM2023-08-10T06:14:21+5:302023-08-10T06:14:48+5:30
मणिपूरमधील हिंसाचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप दु:खी झाले. हिंसाचार सुरू झाला त्या दिवशी पहाटे चार वाजता मोदी यांनी मला फोन करून सर्व घटनेची माहिती घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव, इंद्रकुमार गुजराल यांच्या कार्यकाळात तसेच यूपीएचे सरकार असताना मणिपूरमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. तेव्हा त्यावेळच्या पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत कोणतेही निवेदन केले नव्हते. तेव्हाही कोणीही पंतप्रधान मणिपूरमध्ये गेले नव्हते असे सांगून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
अमित शाह म्हणाले की, मणिपूरमधील हिंसाचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप दु:खी झाले. हिंसाचार सुरू झाला त्या दिवशी पहाटे चार वाजता मोदी यांनी मला फोन करून सर्व घटनेची माहिती घेतली. मी स्वत: तीन दिवस मणिपूरला गेलो होतो. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय २३ दिवस त्या राज्यात तळ ठोकून होते. मणिपूरच्या राज्य सरकारने हिंसाचार रोखण्यात केंद्र सरकारला संपूर्ण सहकार्य देऊ केले. त्यामुळे सरकार बरखास्तीसाठी असलेले कलम ३५६ वापरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
अमित शाह यांनी सांगितले की, केवळ गोंधळ निर्माण करण्यासाठी विरोधी पक्षांनी लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे.
यूपीएने केला भ्रष्ट मार्गाचा अवलंब
अमित शाह म्हणाले की, आपले सरकार काहीही करून वाचविण्यासाठी यूपीएने भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब केला. १९९३ साली काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारवर अविश्वास ठराव आला असता काँग्रेसने गैरमार्गांचा अवलंब करून ते सरकार टिकविले. नरसिंहराव सरकारविरोधी अविश्वास ठराव फेटाळला गेला; पण झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना तुरुंगात जावे लागले. नरसिंहराव यांनाही तुरुंगात जावे लागले. आता तीच काँग्रेस व झामुमाे एकत्र बसले आहेत.
‘राहुल गांधी
यांचे झाले
१३ वेळा लाँचिंग’
राहुल गांधी यांचे नाव न घेता अमित शाह यांनी सांगितले की, काँग्रेसच्या एका नेत्याचे आतापर्यंत १३वेळा राजकारणात लाँचिंग करण्यात आले आहे. कलावती नावाच्या महिलेच्या घरी राहुल गांधी जेवून आले. त्या महिलेला राहण्यासाठी पक्के घर, स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी मोदी सरकारने दिली आहे असेही शाह म्हणाले.
राहुल गांधी म्हणजे भारत नाही
मणिपूर हा वेगळा झाला नसून तो देशाचा अविभाज्य भाग आहे आणि ताे भारताचाच भाग राहिल. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली आहे असे वक्तव्य भारतीय संसदीय लोकशाहीमध्ये प्रथमच कोणीतरी केले व त्या वक्तव्यावर काँग्रेसच्या सदस्यांनी बाके वाजविली. राहुल, तुम्ही म्हणजे भारत देश नाही हे लक्षात ठेवा. लक्षात ठेवा नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत.
- स्मृती इराणी, महिला
व बालकल्याण मंत्री