बॉम्बस्फोट झाला तरी चिनाब पूल भक्कमच!
By Admin | Published: March 22, 2016 03:45 AM2016-03-22T03:45:57+5:302016-03-22T03:45:57+5:30
पॅरिस येथील आयफेल टॉवर तसेच कुतूबिनारपेक्षाही सर्वात उंच असा रेल्वे पुल जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर कोकण रेल्वेकडून उभारण्यात येत आहे
सुशांत मोरे, जम्मू
पॅरिस येथील आयफेल टॉवर तसेच कुतूबिनारपेक्षाही सर्वात उंच असा रेल्वे पुल जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर कोकण रेल्वेकडून उभारण्यात येत आहे. हा पुल उभारल्यानंतर त्याला असणारा दहशतवाद्यांकडून धोका पाहता कोकण रेल्वेने सुरक्षेच्या दृष्टिने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. पुलाच्या बांधकामात उच्च दर्जाची सामुग्री वापरण्यात आली असून ४0 किलोग्रॅम आरडीएक्स किंवा टीएनटीसारखे भयंकर स्फोटके वापरुन स्फोट घडविल्यासही पुलाला फारसा धक्का लागणार नाही आणि या पुलावरुन ट्रेन सुखरुप धावू शकेल, याची खबरदारी घेण्यात आल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले. चिनाब नदीवर बांधण्यात येणारा पुल २0१८-१९ पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही कोकण रेल्वेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
जम्मू आणि काश्मीरमध्ये ३२६ किलोमीटरचा उधमपुर-श्रीनगर-बारामुला रेल्वे जोडणी प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पात असणारे बोगदे, पुल, रेल्वे मार्गाचे काम हे उत्तर रेल्वे, कोकण रेल्वे आणि इरकोनला देण्यात आले आहे. या प्रकल्पात सर्वात महत्वाचा मानला जाणाऱ्या चिनाब नदीवरील सर्वात उंच रेल्वे पुल साकारण्याचे काम हे कोकण रेल्वेकडून केले जात आहे. चिनाब नदीवरील हा पुल जम्मू आणि श्रीनगरला जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा मानला जातो. अशा या पुलाचे काम २00२-0३ पासून सुरु करण्यात आले. नदीच्या तळापासून ३५९ मीटर उंचीवर पुल साकारताना कोकण रेल्वेला मोठे आव्हान स्वीकारावे लागत असल्याचे संजय गुप्ता यांनी सांगितले. आयफेल टॉवरची उंची ही ३२४ किमी तर कुतूबिनारची उंची ही ७२ किलोमीटर एवढी आहे. त्यामुळे जगातील सर्वात उंच असा पुल बांधण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला.पुलाचे काम ६0 टक्के पूर्ण झाले असून २0१८-१९ पर्यंत तो पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली. पुलाच्या बांधकामासाठी २५ हजार मेट्रीक टन स्टील वापरण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर पुल बांधल्यानंतर त्यावर उभारण्यात येणाऱ्या रेल्वे रुळाच्या बाजूलाच वरच्या भागात काही जाळयाही बसविण्यात येतील. जेणेकरुन एखाद्या ट्रेनमधून जाताना दहशतवाद्यांनी स्फोटके टाकल्यास ती जाळीत अडकतील. मजबूत स्टीलचे बांधकाम आणि स्फोटकांमुळे पुलाला फारसा धक्का बसू नये यासाठी बांधकामाचे करण्यात आलेल्या नियोजनामुळे पुल सुरक्षित राहील याची पुरेपुर काळजी घेण्यात आल्याचे गुप्ता यांनी सांगितले. पुलाचा खर्च वाढला
हे बांधकाम दहा वर्षापेक्षाही जास्त कालावधीपासून सुरु आहे. हा पुल २0१५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आता २0१८-१९ मध्ये पुल पूर्ण होणार आहे. याबाबत कोकण रेल्वेचे महाव्यवस्थापक (प्रशासन) सिध्देश्वर तेलगु यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी चिनाब पुलाची पुर्नरचना करण्यात आली. प्रकल्पाची मंजुर रक्कम ५१२ कोटी होती आता ती १,२00 कोटीपर्यंत गेली आहे. सध्या पुलाचे काम सुरु
असून सुरक्षेसाठी १३0 सीआरपीएफ (सेन्ट्रल रिर्जव पोलिस फोर्स)तैनात आहेत.
पूल पुर्ण होताच त्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटिव्ही बसविण्यात येतील.
चनाब पुलाच्या कामासाठी दिवसरात्री जवळपास
१,५00 कर्मचारी राबत आहे.
या पुलाचे आयुुर्मान हे
१२0 वर्ष असणार आहे.
चिनाब पुलाला आधार देण्यासाठी आर्च स्पेनचा (कमानी)आधार देण्यात येणार आहे. मुख्य कमानी जवळपास ४६७ मीटर एवढी असेल.