अखेर आज 16 वर्षांनी इरॉम शर्मिलांचे उपोषण संपणार
By admin | Published: August 9, 2016 09:33 AM2016-08-09T09:33:34+5:302016-08-09T09:33:34+5:30
मणिपुरातून सुरक्षा दलांना विशेषाधिकार देणारा कायदा (आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर अॅक्ट) मागे घेण्यात यावा, यासाठी बेमुदत उपोषण करणा-या इरॉम शर्मिला आज उपोषण सोडणार आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत -
इंफाळ, दि. 9 - मणिपुरातून सुरक्षा दलांना विशेषाधिकार देणारा कायदा (आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर अॅक्ट) मागे घेण्यात यावा, यासाठी बेमुदत उपोषण करणा-या इरॉम शर्मिला आज उपोषण सोडणार आहेत. विशेष म्हणजे तब्बल 16 वर्षांनी इरॉम शर्मिला उपोषण सोडणार आहेत. २000 सालपासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र काही दिवसांपुर्वी त्यांनी आपण उपोषण मागे घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. उपोषणाने प्रश्न सुटणे आजच्या स्थितीत अवघड आहे, असे लक्षात आल्यामुळे आपण हा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले होते.
आपण आता विधानसभेची निवडणूक लढवणार असून, हा कायदा रद्द करण्यात यावा, अशी आपली मागणी आहे आणि त्या मागणीसाठी यापुढेही आपण लढत राहणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले होते. मणिपूरमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. इरॉम शर्मिला या ४४ वर्षांच्या असून, त्यांनी आता विवाह करण्याचेही जाहीर केले आहे. त्यांनी नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या जन्माने भारतीय आणि ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारलेल्या आपल्या मित्राबरोबरच विवाह करणार असल्याचे जाहीर केले.
त्या उपोषण सोडत नसल्यामुळे आणि काहीही खायला वा प्यायला नकार देत असल्याने आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यांना अनेकदा पोलिसांनी अटकही केली होती.
का केले होते उपोषण ?
मणिपूरमधील घुसखोरी थांबवण्यासाठी तिथे लष्कर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आफ्स्पा कायद्यामुळे लष्कराला मिळालेल्या अमर्याद अधिकारांतून तेथील सामान्य जनतेवर अनन्वित अत्याचार होत असल्याच्या खूप तक्रारी होत्या.
केवळ संशयामुळे कोणाच्या घरात घुसणे, कोणालाही ताब्यात घेणे, अतिरेकी ठरवून मारून टाकणे, असे प्रकार लष्कराने केल्याचा आरोप होत होते. त्यातच मालोम बसस्टॉपवर उभ्या असलेल्या १0 स्थानिक रहिवाशांना आसाम रायफलच्या जवानांनी ठार करून, ती चकमक असल्याचे दाखवले होते.