अखेर साहित्य अकादमीने मौन सोडले, कलबुर्गींच्या हत्येचा केला निषेध
By admin | Published: October 23, 2015 02:36 PM2015-10-23T14:36:44+5:302015-10-23T14:36:44+5:30
साहित्यिकांच्या दबावापुढे झुकत साहित्य अकादमीने कलबुर्गी हत्या व वाढत्या असहिष्णूतेचा निषेध एका विशेष सभेत ठराव संमत करून केला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - अखेर, साहित्यिकांच्या दबावापुढे झुकत साहित्य अकादमीने कलबुर्गी हत्या व वाढत्या असहिष्णूतेचा निषेध एका विशेष सभेत ठराव संमत करून केला आहे. कर्नाटकातील विचारवंत साहित्यिक कलबुर्गींची हत्या आणि दादरी हत्याकांड या घटनांचा निषेध करत अनेक साहित्यिकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले होते. तसेच, साहित्य अकादमी मौन बाळगून का आहे असा सवाल साधा निषेधही अकादमीने का केला नाही असा सवाल आंदोलक साहित्यिकांनी विचारला होता. आज, शुक्रवारी तर साहित्यिकांनी नवी दिल्लीमध्ये मौन मोर्चा काढून वाढत्या असहिष्ण वातावरणाचा निषेध केला तसेच साहित्य अकादमीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले.
अखेर, साहित्य अकादमीने आज कार्यकारिणीची विशेष सभा बोलावली. कलबुर्गींच्या हत्येचा निषेध केला तसेच मारेक-याला लवकरात लवकर पकडण्यात यावे अशी मागणी केली. याबरोबरच ज्या साहित्यिकांनी पुरस्कार परत केले आहेत, त्यांनी ते पुन्हा स्वीकारावेत असे आवाहनही केल्याचे अकादमीच्या के नचिमुथू यांनी सांगितले. ज्या अधिका-यांनी निषेध म्हणून अकादमी सोडली आहे, त्यांनीही पुन्हा कामावर रुजू व्हावे असे आवाहनही नचिमुथूंनी केले आहे. सभा संपल्यावर पत्रकारांशी बोलताना नचिमुथूंनी ही माहिती दिली.