प्रत्येक मुलाला बसणार उष्णतेच्या लाटेचा फटका; प्रचंड तापमानामुळे भविष्याला धोका, शेतीही संकटात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 11:23 AM2023-05-10T11:23:36+5:302023-05-10T11:24:43+5:30
आशियातील अनेक देशांमध्ये तापमानाचा नवा विक्रम होत असून, २०२३ हे वर्ष संपूर्ण जगासाठी सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची भीती आहे.
नवी दिल्ली : आशियातील अनेक देशांमध्ये तापमानाचा नवा विक्रम होत असून, २०२३ हे वर्ष संपूर्ण जगासाठी सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची भीती आहे. उत्तर गोलार्धातील वाढते तापमान हे एक मोठ्या संकटाची चाहूल असून, एल निनोमुळे तापमान अभूतपूर्व पातळीवर पोहोचत आहे. वाढत्या तापमानाचा आशियातील मोठ्या लोक संख्येवर परिणाम झाला आहे.
उष्णतेच्या प्रकोपामुळे शेतीवरील संकट वाढत आहे. मानवी हस्तक्षेपांमुळे हवामान संकट आणखी वाढले आहे. या संकटाचा परिणाम जसजसा तीव्र होत जाईल तसतसे उष्णतेच्या लाटा आणखी विध्वंसक होतील, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
इम्रान खान यांना अटक का?, शिवसेनेचा कोणाला टोला; सांगितलं सुडाचं राज'कारण'
मुलांच्या शिक्षणावर परिणाम
फिलीपिन्समध्ये उष्मा निर्देशांक धोक्याची पातळीवर गेल्याने शाळेचे तास कमी करावे लागले आहेत. एप्रिलच्या मध्यात, थायलंडमध्ये तापमान ४४.६ अंशांवर पोहोचले. बांगलादेशची राजधानी ढाका येथेही ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे १९६० नंतरचे सर्वाधिक तापमान आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, २०३० च्या दशकात तापमान १.५ अंश सेल्सिअस ओलांडण्याची भीती आहे.
तापमानाचे परिणाम...
२ अब्ज पेक्षा अधिक शहरी लोकांवर प्रचंड तापमानाचा परिणाम होत आहे.
२०५० पर्यंत जगातील जवळजवळ प्रत्येक मुलाला उष्णतेच्या लाटेचा फटका बसेल.
१९८० पासून तापमानाच्या एक्सपोजरमध्ये २०० टक्के वाढ .
मागील ८ वर्षे रेकॉर्डब्रेक तापमान वाढीची ठरली आहेत.
भारतावर काय परिणाम?
मार्च हा महिना आशियातील या वर्षातील सर्वात उष्ण महिना ठरला आहे. चीनमध्ये २०२२ मध्ये भयंकर तापमान आणि दुष्काळानंतर सुमारे एक वर्षांनी १०० हून अधिक हवामान केंद्रांनी गेल्या महिन्यात चीनमध्ये सर्वोच्च तापमान नोंदवले.
भारत आणि पाकिस्तानच्या काही भागांमध्ये हवामानाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या वर्षांत अति उष्णतेच्या लाटा आणि वातावरणातील प्रचंड बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. २०२२ मध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेसारख्याच या घटना असतील आणि त्याचा भारतीय उपखंडावर गंभीर परिणाम होईल, अशी भीती आहे.