'नीट' परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र हवे
By admin | Published: March 15, 2017 10:01 PM2017-03-15T22:01:21+5:302017-03-15T22:01:21+5:30
सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएससी) तर्फे देशभर आयोजित होणाऱ्या नॅशनल एलिजिबिलिटी अँड एन्ट्रन्स टेस्ट
सुरेश भटेवरा / ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएससी) तर्फे देशभर आयोजित होणाऱ्या नॅशनल एलिजिबिलिटी अँड एन्ट्रन्स टेस्ट (एनईईटी) परीक्षांसाठी महाराष्ट्रात यंदा फक्त मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे व औरंगाबाद या सहा केंद्रांची निवड करण्यात आली आहे.
पूर्वी मेडिकल एन्ट्रन्स टेस्टसाठी प्रत्येक जिल्ह्यात परीक्षेचे केंद्र होते. यंदा राज्यात सुमारे ३ लाखांहून अधिक विद्यार्थी नीट (एनईईटी) परीक्षेला बसणार आहेत. या विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेसाठी शेकडो मैलांचा प्रवास करावा लागणार असून अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागणार आहे. लाखो विद्यार्थ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी (एनईईटी) परीक्षा केंद्र योजण्यात यावे व तशा सुचना परीक्षा आयोजित करणाऱ्या यंत्रणेला देण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांकडे केली आहे.
सातव यांच्या मागणीला दुजोरा देण्यासाठी याच पत्रावर खासदार अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे, धनंजय महाडिक, रजनी पाटील व हुसेन दलवाई यांनीही स्वाक्षऱ्या केल्या आहेत.