'प्रत्येक हिंदूने चार मुलं जन्माला घातली पाहिजेत, आम्ही संन्यासी त्यांचा सांभाळ करु'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 02:47 PM2018-02-15T14:47:14+5:302018-02-15T14:49:31+5:30
एका विशिष्ट समाजाला वाढत्या लोकसंख्येसाठी जबाबदार धरताना त्यांनी हिंदूंना चार ते पाच मुलं जन्माला घालण्याचा अजब सल्ला नरसिम्हा सरस्वती यांनी दिला आहे
नवी दिल्ली - स्वत:ला अखिल भारतीय संत परिषदेचे राष्ट्रीय संयोजक म्हणवून घेणारे नरसिम्हा सरस्वती महाराज यांनी देशातील लोकसंख्येवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका विशिष्ट समाजाला वाढत्या लोकसंख्येसाठी जबाबदार धरताना त्यांनी हिंदूंना चार ते पाच मुलं जन्माला घालण्याचा अजब सल्ला त्यांनी दिला आहे. मुलांचा सांभाळ करणं शक्य नसेल तर आमच्याकडे सोपवा आम्ही सांभाळ करु असंही त्यांनी म्हटलं आहे. नरसिम्हा यांचा वादग्रस्त वक्तव्य करतानाचा व्हिडीओही समोर आला आहे.
नरसिम्हा सरस्वती महाराजांनी म्हटलं आहे की, 'हिंदूंना मी आव्हान करु इच्छितो की जोपर्यंत भारत सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी चीनप्रमाणे एखादा कठोर कायदा आणत नाही जेणेकरुन इस्लामिक जिहादींच्या संख्येवर नियंत्रण येईल तोपर्यंत हिंदूंना आपली लोकसंख्या कमी होऊन द्यायची नाही. प्रत्येक हिंदूने चार ते पाच मुलं जन्माला घातली पाहिजे. आपण इतकी मुलं सांभाळू शकत नाही असं म्हणणा-यांनी मुलं जन्माला घालून आम्हा संन्याशांककडे सोपवावीत, आम्ही त्यांचा सांभाळ करु. आम्ही त्यासाठी गुरुकूल सुरु केले आहेत, तिथे त्यांचं शिक्षणही पुर्ण करु'.
लोकसंख्या नियंत्रित न केल्यास गृहयुद्ध परिस्थिती निर्माण होईल असंही ते बोलले आहेत. वादग्रस्त वक्तव्य करताना सरस्वती महाराज यांनी आरोप केला आहे की, 'काही लोक लोकशाहीचा वापर करत आपली लोकसंख्या वाढवून देशावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. संपुर्ण जग हिंदूकडून हिसकावण्यात आलं आहे, आणि भारत हिंदूसाठी शेवटचा पर्याय आहे'.