पीओकेतील प्रत्येक इंच जमीन भारताचीच; गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 05:43 AM2024-05-11T05:43:56+5:302024-05-11T05:44:25+5:30
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असा ठराव भारताच्या संसदेत एकमताने संमत झाला आहे.
खुंटी : पाकव्याप्त काश्मीरबद्दल काँग्रेस सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे. मात्र, पाकव्याप्त काश्मीरमधील प्रत्येक इंच जमीन ही भारताचा अविभाज्य भाग आहे. तो भाग कोणतीही शक्ती भारतापासून हिरावून घेऊ शकणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असा ठराव भारताच्या संसदेत एकमताने संमत झाला आहे. हे सर्व माहिती असूनही काँग्रेस विचित्र वक्तव्ये करत आहे. मात्र, पाकव्याप्त काश्मीरचा प्रत्येक इंचाचा प्रदेश हा भारताचाच भाग असून, भविष्यातही हीच स्थिती कायम राहणार आहे, असे ते म्हणाले.
झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील आघाडी ही भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. काँग्रेसने अयोध्येत भगवान श्रीरामाचे मंदिर बांधण्यात अडथळे आणले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राहुल गांधी उपस्थित राहिले नाहीत. काँग्रेसच्या मतपेढीला धक्का लागेल अशी भीती त्यांना वाटली होती असा दावाही अमित शाह यांनी केला. (वृत्तसंस्था)
तृणमूल लांगुलचान, भ्रष्टाचाराचे समर्थन करते
तृणमूल काँग्रेस लांगुलचालन, माफियाराज व भ्रष्टाचार या तीन गोष्टींचे समर्थन करते, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.
राणाघाट व बीरभूम लोकसभा मतदारसंघांत शुक्रवारी घेतलेल्या प्रचारसभांमध्ये ते म्हणाले की, संदेशखालीमध्ये महिलांचा धर्म कोणता आहे ते पाहून त्यांचा छळ करण्यात आला.
या अत्याचार प्रकरणांतील सर्व आरोपींवर कठोर कारवाई केल्याशिवाय भाजप गप्प बसणार नाही, असेही अमित शाह म्हणाले.