प्रत्येक नागरिकाला सन्मानानं मरण्याचा अधिकार- सरन्यायाधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 10:42 AM2018-09-09T10:42:03+5:302018-09-09T10:42:23+5:30
इच्छामरणाच्या विषयावर सरन्यायाधीश जीपक मिश्रा यांचं महत्त्वपूर्ण विधान
पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी इच्छामरणाच्या मुद्यावर महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. कायद्याच्या तर्कानं पाहता, कोणतीही व्यक्ती आत्महत्या करू शकत नाही. मात्र प्रत्येक व्यक्तीला सन्मानानं मरण्याचा अधिकार आहे, असं दीपक मिश्रा पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका व्याख्यानमालेला संबोधित करताना म्हणाले. 'बॅलेन्सिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनल राईट्स' विषयावर आधारित व्याख्यानमालेला सरन्यायाधीश उपस्थित होते.
एखादी व्यक्ती स्वत:साठी लिविंग विल तयार करू शकते, असं दीपक मिश्रा व्याख्यानमालेत म्हणाले. 'एखाद्या व्यक्तीला कधीही बरा न होणारा आजार झाला असेल आणि त्यामुळे त्या व्यक्तीला इच्छामरण हवं असेल, तर ती व्यक्ती स्वत:साठी लिविंग विल तयार करु शकते. आपण शेवटचा श्वास कधी घ्यायचा, हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. यासाठी त्या व्यक्तीवर कोणताही दबाव नसावा,' असं सरन्यायाधीशांनी म्हटलं.
9 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयानं दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं एक ऐतिहासिक निर्णय दिला होता. मरणासन्न व्यक्तीनं इच्छामरणासाठी लिहिलेल्या लिविंग विलला काही मार्गदर्शक सूचनांसह मंजुरी देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला होता. आपण शेवटचा श्वास कधी घ्यावा, हे ठरवण्याचा अधिकार मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीला आहे, असं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं होतं. त्याच निकालाचा संदर्भ सरन्यायाधीशांनी व्याख्यानमालेत बोलताना दिला. प्रत्येक व्यक्तीला सन्मानानं मरण्याचा पूर्ण अधिकार आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.