दंगलीत सहभागी प्रत्येक व्यक्ती तितकीच जबाबदार - गुजरात उच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2016 09:51 AM2016-04-19T09:51:21+5:302016-04-19T09:51:21+5:30
गर्दीत सहभागी असलेल्या एका व्यक्तीने गुन्हा केल्यास त्याची जबाबदारी त्याठिकाणी उपस्थित सर्वांचीच असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
अहमदाबाद, दि. १९ - दंगलीत सहभागी झालेली प्रत्येक व्यक्ती तितकीच जबाबदार असल्याच मत गुजरात उच्च न्यायालयाने मांडलं आहे. गर्दीत सहभागी असलेल्या एका व्यक्तीने गुन्हा केल्यास त्याची जबाबदारी त्याठिकाणी उपस्थित सर्वांचीच असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. अहमदाबादमधील शाह-ए-आलम परिसरातील हत्या, दरोडा आणि दंगल प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या 13 वर्षीय जुन्या प्रकरणातील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे मत मांडलं आहे.
2003मध्ये जमावाने प्रवाशांना मारहाण केली होती, दरोडा टाकला होता तसंच मुकेश पांचाळ या व्यक्तीची हत्या केली होती. याप्रकरणी 12पैकी 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात अर्ज करण्यात आला आहे.
'दंगलींच्या प्रकरणांना व्यवस्थित हाताळणे गरजेचे आहे. दंगलींमध्ये मृत्यू आणि जखमी होण्याच्या घटना नेहमी समोर येत असतात.दंगलींमध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी असतात. मात्र त्यातील एखाद्या कट्टर व्यक्तीवर पुरावे अवलंबून असतात. अशावेळी निर्दोष लोकांना शिक्षा होण्याचीदेखील शक्यता असते. आपल्या शत्रुंना यामध्ये गोवण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात', असं मत न्यायाझीश झवेरी आणि शाह यांच्या खंडपीठाने मांडलं आहे.
'बेकायदेशीररित्या एखाद्या गोष्टीविरोधात निदर्शन करण्यासाठी जमलेल्या जमावापैकी एका व्यक्तीने जरी गुन्हा केला तरी कायद्याप्रमाणे जमावातील प्रत्येक व्यक्ती त्या गुन्ह्यासाठी जबाबदार असल्याचंही', न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं आहे. आरोपी फक्त प्रेक्षत होते हा बचावपक्षाचा दावा न्यायालयाने फेटाळला आहे. 'शहरात भीती निर्माण करण्याचा त्यांचा उद्धेश स्पष्ट होता', असं न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायालयाने आरोपींची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली असून 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.