दरवर्षी ५ कोटी भाविक रामललाचे दर्शन घेणार; अयोध्येत वेगाने सुरु आहेत विकासकामे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 08:29 AM2024-01-23T08:29:08+5:302024-01-23T08:29:16+5:30
अयोध्येत सध्या १० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीद्वारे विकासकामे सुरू आहेत.
नवी दिल्ली : अयोध्येच्या रूपाने भारतास नवे पर्यटनस्थळ मिळाले असून, येथे दरवर्षी किमान ५ कोटी यात्रेकरू भेट देतील, असा अंदाज ब्रोकरेज संस्था जेफरीजने एका अहवालात व्यक्त केला आहे. अयोध्येत सध्या १० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीद्वारे विकासकामे सुरू आहेत. त्यातून एक विमानतळ, विशाल रेल्वे स्थानक, नवीन शहर निर्मिती (टाऊनशिप) आणि उत्तम संपर्क रस्ते यांची उभारणी त्यातून केली जात आहे. अयोध्येत कित्येक नवीन हॉटेलांची निर्मिती होत आहे.
१,२०० एकरवर ग्रीनफिल्ड टाऊनशिप
विमानतळाचा १७.५ कोटी डॉलर खर्चाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. हे विमानतळ १० लाख प्रवासी सांभाळू शकते. २०२५ पर्यंत ते पूर्ण होईल, तेव्हा त्याची क्षमता ६० लाख प्रवाशांची असेल. अयोध्येत उभ्या राहिलेल्या नव्या रेल्वे स्थानकाची क्षमता ६० हजार प्रवाशांची आहे.
शरयू नदीच्या किनारी १,२०० एकरवर ग्रीनफिल्ड टाऊनशिप उभी राहत आहे. यात अमिताभ बच्चन यांनी मोठा भूखंड घेतला आहे.