दरवर्षी हजारो किलो अमली पदार्थ होतात जप्त, मोजकेच ठरतात दोषी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 12:51 AM2020-09-07T00:51:36+5:302020-09-07T00:51:42+5:30
एनसीबीकडून देशात दरवर्षी हजारो किलो नशेचे पदार्थ जप्त केले जातात व हजारो लोकांना अटकही होते; पण फार कमी लोक गुन्हेगार सिद्ध होतात.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यूचे धागे अमली पदार्थांशी जोडले गेल्यानंतर नशा आणि मादक पदार्थांच्या काळ्या कारभाराची चर्चा सुरू झाली आहे. राजपूत प्रकरणात चर्चेत आला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) देशात ड्रग्जच्या धंद्याला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारची ही महत्त्वाची संस्था आहे. एनसीबीकडून देशात दरवर्षी हजारो किलो नशेचे पदार्थ जप्त केले जातात व हजारो लोकांना अटकही होते; पण फार कमी लोक गुन्हेगार सिद्ध होतात.
गृहमंत्रालयाच्या आकड्यांनुसार २०१८-२०१९ मध्ये एनसीबीने जवळपास २५६ किलो हेरॉईन, ३७५ किलो अफू, २.६६ किलो मॉरफीन, ३५१०६ किलो गांजा, ९५० किलो हशीश, २२ किलो कोकेन, २ किलोपेक्षा जास्त मेथाकुआलोन आणि ६० किलोपेक्षा जास्त एमपेथामाईनस पकडले होते. याशिवाय नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ७.६० लाख गोळ्या, १०,३०० इंजेक्शन आणि १२८ किलो एफेड्रिन जप्त केले होते. एनसीबीने वेगवेगळ्या सरकारी एजन्सींच्या मदतीने अरुणाचल, बिहार, जम्मू-कश्मीर, झारखंड, मणिपूर, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये ७८८७ एकरवर उभे अफीमचे बेकायदा पीक नष्ट केले.
गृहमंत्रालयाच्या वार्षिक अहवालानुसार एजन्सीने यादरम्यान आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओदिशा,
त्रिपुरा आणि तेलंगणामध्ये ४३०० एकरमध्ये गांजाचे उभे पीक नष्ट केले होते. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ यादरम्यान १२ महिन्यांत एजन्सीने न्यायालयाच्या माध्यमातून फक्त ६१ प्रकरणांतच शिक्षा दिली. एनसीआरबीच्या वार्षिक अहवालात एनसीबीच्या हवाल्याने म्हटले आहे की, वर्ष २०१८ मध्ये नशेच्या पदार्थप्रकरणी देशभरात ४९,४५० प्रकरणांत ६०१५६ लोकांना अटक झाली होती. गृहमंत्रालयाच्या २०१७-२०१८ च्या वार्षिक अहवालानुसार एनसीबीद्वारे ४५ प्रकरणी न्यायालयाने शिक्षा दिली.