माझ्या लग्नात सीबीआय, भूत- खेतं सर्वजण येणार, तेजप्रताप यादव यांचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 06:19 PM2017-10-02T18:19:58+5:302017-10-02T18:20:45+5:30
ज्यावेळी माझे लग्न होईल, त्यावेळी माझ्या लग्नात सीबीआय, भूत-खेतं सर्वजण येणार असल्याचे बिहारचे माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी गमतीने सांगितले.
पटना - ज्यावेळी माझे लग्न होईल, त्यावेळी माझ्या लग्नात सीबीआय, भूत-खेतं सर्वजण येणार असल्याचे बिहारचे माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी गमतीने सांगितले. गेल्या काही दिवसांपासून लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांवर सीबीआयची छापेमारी सुरु आहे, त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केल्याचे समजते.
पटनामधील एका लग्नसमारंभात तेजप्रताप यादव यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी त्यांच्या लग्नाबाबत विचारले असता, ते म्हणाले माझ्या लग्नात सीबीआय, भूत- खेतं सर्वजण येणार असल्याचे गमतीने सांगितले. बिहारमध्ये बाल विवाह आणि हुंडा प्रतिबंधात्मक अभियानाला आजपासून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुरुवात केली आहे. यावर बोलताना तेजप्रताप यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. एखाद्या मुलीचे वडील हुंडा देणार असतील तर त्यांनी कोण थांबविणार, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, महात्मा गांधीच्या 148 व्या जयंती निमित्त मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नव निर्मित बापू सभागृहात बाल विवाह आणि हुंडाविरोधी राज्यव्यापी आंदोलनाला सुरवात केली आहे. यावेळी त्यांनी लोकांना शपथ दिली की, ज्या लग्नात हुंडा दिला जाईल किंवा घेतला जाईल, त्या लग्नात मी जाणार नाही.
बाल विवाह विरोधी कडक कायदे असून देखील बिहारमध्ये बाल विवाहाची प्रथा प्रचलित आहे. खासकरून बिहारमधील ग्रामीण भागात ही कुप्रथा अधिक प्रमाणात पसरलेली आहे. काही वर्षांपूर्वी बिहारमध्ये होणारे 69 टक्के विवाह हे बालविवाह होत असे. परंतू नुकतेच झालेल्या राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य सर्वेक्षणानुसार गेल्या 10 वर्षात मुलींना सक्तीचे शिक्षण दिले गेल्यामुळे बालविवाहाचा आकडा घटण्यास मदत झाली आहे.