कॉलेज विद्यार्थी रोज १५० वेळा डोकावतात स्मार्टफोनमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:41 AM2018-05-21T00:41:46+5:302018-05-21T00:41:46+5:30
८० टक्के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे स्वत:चे मोबाइल फोन आहेत.
नवी दिल्ली : ‘मला वेड लागले प्रेमाचे' हे टाइमपास या मराठी चित्रपटातील गाजलेले गाणे. त्यातील शब्दांत थोडा बदल करुन ‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेड लागले स्मार्टफोनचे' असे म्हणायची वेळ आली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी विविध कारणांनी रोज १५0 वेळा स्मार्टफोनमध्ये डोकावतात असा निष्कर्ष अलिगढ मुस्लिम विद्यापीठ व इंडियन कौन्सिल आॅफ सोशल सायन्स रिसर्च (आयसीएसएसआर)ने केलेल्या पाहणीतून काढण्यात आला आहे.
‘स्मार्टफोनवरील अवलंबित्व, त्याच्या खरेदीतील प्रवाह, चंगळवादी वृत्ती : डिजिटल इंडियासाठी चाललेल्या प्रयत्नांचे होत असलेले परिणाम' असा या पाहणीचा विषय होता. त्यासाठी देशभरातील २0 केंद्रीय विद्यापीठांमधील प्रत्येकी दोनशे विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
एखादी गोष्टीची माहिती आपल्याला नाही किंवा ती आपण जाणून घेतली नाही, असे या विद्यार्थ्यांना सतत वाटत असते. त्यामुळे ते रोज किमान १५0 वेळा स्मार्टफोनमध्ये डोकावतात, इंटरनेटवर अनेक गोष्टी पाहातात. त्याचा त्यांच्या आरोग्य व शैैक्षणिक प्रगतीवरही परिणाम होत आहे.
80% टक्क्यांकडे स्वत:चे फोन
८० टक्के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे स्वत:चे मोबाइल फोन आहेत. त्यातही विविध अॅप्लिकेशन व फीचर्ससाठी ते स्मार्टफोन वापरण्यासच प्राधान्य देतात. संगणकापेक्षा स्मार्टफोनवर काम करणे अधिक सोयीचे वाटत असल्यानेही त्याचा वापर अनेक विद्यार्थ्यांकडून होतो.
आठ तास फोनवर पडीक
पाहणीप्रकल्पाचे प्रमुख मोहम्मद नावेद खान यांनी सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यापैकी २८ टक्के विद्यार्थी हे केवळ कॉल करण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करतात. बाकीचे विद्यार्थी सोशल नेटवर्किंग साइटवर जाण्यासाठी तसेच गुगल सर्चमध्ये जाऊन अनेक गोष्टींची माहिती व मनोरंजनासाठी स्मार्टफोनमध्ये डोकावतात.